राज्य शासनाकडील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र. उष्माघात/2023/प्र.क्र.38/आव्यप्र-1/ दि. 23 मार्च, 2023 अन्वये उष्माघाताच्या अनुषंगाने आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत.
या सूचनेनुसार उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने दक्षता घेणे आवश्यक आहे. त्याकरिता उष्मा लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी –
1) पुरेसे पाणी प्यावे व तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे.
2) घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.
3) दुपारी 12 ते 3 वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
4) सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा.
5) उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
6) हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
7) प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
8) उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा.
9) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा.
10) अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम अशी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
11) गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
12) घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
13) पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
14) कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
15) सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचना द्याव्यात.
16) पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा तसेच बाहेर काम करीत असल्यास मध्ये-मध्ये थोडा थोडा वेळ विश्रांती घेऊन नियमित आराम करावा.
17) गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.
– अशा गोष्टी कराव्यात त्याचप्रमाणे उष्मालाटेपासून बचाव होण्यासाठी न करावयाच्या बाबी म्हणजे –
1) उन्हात अतिकष्टाची कामे करू नयेत.
2) दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नयेत.
3) दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
4) उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये.
5) लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
6) गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
7) बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
8) उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.महाराष्ट्र राज्य हे उष्णतेच्या लाटेसाठी संवेदनशील राज्य असून उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी नमूद केलेल्या गोष्टींचे पालन करावे तसेच उष्णता विकारांची लक्षणे आढळल्यास किंवा याबाबत अधिक माहिती हवी असल्यास आपल्या नजीकच्या नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय किंवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *