एन आर नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसची स्थापना करून आयटी क्षेत्रात क्रांती केली. जगभरात त्यांच्या उद्योगाचा पसारा वाढला. पन्नास देशात तीन लाखांहून अधिक कर्मचारी इन्फोसिसच्या पदरी आहेत. मूर्ती हे अशा या बड्या कंपनीचे मालक चालक आहेत. आता निवृत्त असले तरी त्यांचाच शब्द इन्फोसिसमध्ये चालतो यातही शंका नाही. त्यांनी काही काळापूर्वी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की, “भारतातील कर्मचाऱ्यांनी आठवड्याला किमान सत्तर तास काम केले पाहिजे, तर देशाची प्रगती वेगाने होईल…” नारायण मूर्ती हे स्वतः मोठ्या कष्टातून वर आले आहेत. आज व्यक्तीगतरीत्या ते पंचेचाळीस हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. पण त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्थितीची तरी त्यांना पुरती कल्पना आहे की नाही कोण जाणे ? बहुधा नसावी! अन्यथा त्यांनी असे विधान केलेच नसते. मूर्ती यांच्या त्या विधानाची री ओढणारे आणखी एक बड्या उद्योगाचे अध्यक्ष व एमडी निघाले आहेत. एल अँड टी या दुसऱ्या बड्या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एन. एल. सुब्रमण्यन यांनी असे तारे तोडले आहेत की “काय झाले कामगार कर्मचाऱ्यांनी नव्वद तास का केले तर ? केलंच पाहिजे! रविवारी घरी बसून काय करता ? बायकोचे तोंड तरी किती वेळ बघाल!! त्या पेक्षा ऑफीसात या. रविवारीही काम करा. मी स्वतः रविवारीही काम करतो. सुटी घेत नाही….” इनफोसिस आयटी क्षेत्रात आहे. तर एल अँड टी ही कंपनी मोठ्या यंत्रसामग्री निर्मिती बरोबरच अन्य असंख्य उद्योगात काम करते. त्यांच्याही दिमतीला सुमारे साठ हजार कर्मचारी आहेत. इन्फोसिसची अपेक्षा सत्तर दिवस काम करावे अशी आहे, तर एल अँड टीचे म्हणणे आहे की आठवड्यात किमान नव्वद तास काम करावे. या मागण्या, अशा अपेक्षा संतापजनक आहेत. ब्रिटिश राजवटीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातील कामगारांनी रविवारच्या सुटीचा आग्रह धरला. संप झाले तेंव्हा गिरणी कामगारांना आठवड्याचा एक दिवस सुटीचा मिळाला. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ख्रिश्चन धर्माला साजेसा, प्रभूच्या प्रार्थनेचा रविवर हा सुटीचा दिवस ठरवला. आता नवे कोट्याधीश मालक रविवारची कमकाग कर्मचाऱ्यांच्या हक्काची साप्ताहिक सुटीच नसावी असे म्हणत आहेत. सुब्रमण्यन यांच्या विधानावर समाजमाध्यमांतून संतप्त प्रतिक्राया उमटल्या आणि ते सहाजिकच होते. त्यांच्या बोलण्यातील रविवारी घरी बसून काय करता, बायकोकडे किती वेळ बघाल या वाक्याला महिला पुरूष दोन्ही वर्गांनी आक्षेप घेतला. सिनेकलावंत दीपिका पदुकोन, बॅडमिंटन पूट ज्वाला गुट्टा असा महिलांनी सुब्रमण्यान यांच्या विधानांवर आक्षेप तर घेतलेच पण त्यांची खिल्लीही उडवली. पदुकोनने म्हटले की, “इतक्या उच्चपदस्थ व्यक्तीने अशा प्रकारची विधाने कऱणे धक्कादायक, तसेच दुःखदायकही आहे.” गुट्टाने म्हटले की “खरेतर कर्मचाऱ्यांनी आपल्याच बायकोला का बघु नये किंवा त्याने फक्त रविवारची तिच्याकडे बघावे असे तरी का म्हणावे ?!” उद्योग विश्वातील अनेक महनीय व्यक्तींनीही सुब्रमण्यन यांच्यावर टीकेची झोड उठवली. उद्योजक हर्ष गोयंका म्हणाले की रविवारीही काम करायला सांगणे याचा अर्थ साप्ताहिक सुटीची संकल्पनाच चुकीची आहे असे म्हणणे ठरते. हा विचार साफ चूक आहे. शिवाय माझ्या मते किती तास काम केलेत, या पेक्षा काय दर्जाचे काम झाले हे महत्वाचे ठरते. कामगाराने, कर्मचाऱ्याने सतत ऑफीसमध्येच असावे हेही म्हणणे अयोग्य असा सूर सर्वांनीच आळवला. इतकी टीका झाल्यावर सुब्रमण्यन यांच्यावतीने असे सांगण्यात आले की, “ते उद्गार म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी दिलेला कंपनीचा आदेश नव्हता. तर फक्त एक अपेक्षा व्यक्त केली होती. आणि कंपनीच्या अंतर्गत बैठकीतील ते बोलणे होते. ते तडून मोडून एक्स वगैरे ठिकाणी आले ते योग्य नाही.…” या खुलासातही काही दम दिसत नाही. करण असले हे बोलणे, कुठेही बोलले गेले असेल, तरीही असा व्हीडिओ समाजमाध्यमांवर झळकतो, तेंव्हा तो सार्वजनिक टीकेलाही तितकाच पात्र ठरतो, ही वस्तुस्थिती आहे. खरेतर नारायण मूर्ती काय वा सुब्रमण्यन काय, त्यांना मुंबईसारख्या शहरात कामगार कर्मचारी कसे जगताता हेच माहिती नाही असेच म्हणावे लागेल. महामुंबईच्या एका टोकाकडून दोन दोन तासांचा प्रवास करून आधीच थकलेला कर्मचारी दुसऱ्या टोकाच्या आपल्या कचेरीत वा कारखान्यात पोचतो. तिथे त्यांना आठ तास तर काम करावेच लागते. त्याचा जाण्या-येण्याचा प्रवासाचा वेळ जमेस धरला तर , त्याचा कामकाजाचा दिवस हा आधीच बारा तेरा तासाचा झालेला असतो. त्यात त्याने कचेरीत वा कारखान्यातच बारा तास असावे, थांबावे अशी अपेक्षा करणे हे कर्मचाऱ्याला आणखी खोल नरकात ढकलणेच आहे. हा क्रूर विचार फक्त पन्नास कोटीचे पॅकेज घेणारे बिझनेस क्लासने कंपनी खर्चात जगाची सफर करणारे आणि सतत एसी आलीशान गाड्यांतून फिरणारेच असंवेदनशील मालक-चालक करू शकतात. आयटीसारख्या क्षेत्रातील कर्मचाऱ्याला भलेही महिना दीड दोन लाख पगार असेल, फण त्या मोबदल्यात त्याला किती पिदवून घेतले जाते हे मूर्तीसाहेबांनी आपल्याच कंपनीच्या ग्रुप हेड मंडळींना विचारावे. अनेक आयटीतील तरूण पोरां-पोरींना कामाच्या प्रचंड तणावाखाली कुढत कुढत जगावे लागते आहे. या क्षेत्रातील तरूण मुला-मुलींच्या आत्महत्यांचे प्रमाण धक्कादायक आहे. कामाच्या तणाने घरात नवारा बायकोला एकमेकांशी बोलायलाही उसंत नाही, अशी लाखो कुटुंबे आहेत. नवरा व बायको दोघेही आयटी वा तत्सम सेवा उद्योगात काम करत असतील तर त्यांना असणाऱ्या लहान मुलांचे हाल होत असतात. तया बळाच्या आजी आजोबांना मुलांचा तणाव सहन करीत स्वतःच्या तब्बेती सांभाळत आता मुलांचेही संसार करावे लागत असल्याचीही हजारो उदाहरणे अवती भोवती दिसतात. मुळात वर्क फ्रॉम होम या संकल्पनेचीही पूर्ण झाडा-झडती घेतली गेली पाहिजे. घरातून काम याच अर्थ तो कर्मचारी चोवीस तास कंपनीच्याच कामाला बांधील आहे असा गैरसमज कंपनीच्या चालक मालकांचा झालेला असतो. वेळी अवेळी यांचे कॉल सुरु असतात. आंतरराष्ट्रीय गिऱ्हाईकांच्या देशातील सोईच्या वेळा या भारतासाठी अवेळाच असतात. त्यांचे काय व किती हाल होतात हे मूर्ती वा सुब्रमण्यान वा तत्सम साहेबांनी जाणून तरी घेतले आहे का ? खरेतर कर्मचाऱ्यांसंदर्भातील बेफिकिरीची अवस्था सर्वच क्षेत्रात दिसते. सरकारी कर्मचारी जे कायम स्वरुपी आहेत त्यांना नोकरीच्या वेळा तसेच चांगला पगार या बाबतीत कायद्याचे संरक्षण असते. पण त्यांनाही दूर राहण्याची जागा व दक्षिण मुंबईतील कामाचे ठिकाण ही प्रवासीची तापदायक कसरत करवीच लागते. पण आता सरकारी कामांमध्येही कंत्राटी पद्धती रुजलेली आहे आणि वाढते आहे. हे मोठ्या प्रमाणात खाजगी व सरकारी कामातील कंत्राटी कमगार हे नियमित कर्मचाऱ्यापेक्षा निम्मा पगार व दुप्पट काम अशा स्थितीत, ढोर मेहनत करत असतात. काम व घर यांचा समतोल साधला गेला नाही, कर्मचाऱ्याला कुटुंबात राहण्याचे सुख लाभले नाही, तर त्याच्या कामावरही परिणाम होतो. कर्मचाऱ्याचया जीवनाच्या गुणवत्तेसाठी काही नियम आता अमेरिकन सरकारने आखले आहेत. तिथले सर्जन जनरल हे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत जागृत असतात या महत्वाच्या घटनातम्क पदावरील सर्जन जनरल यांनी अलिकडेच कर्माचाऱ्यांच्याशारिरीक तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी कामाच्या ठिकाणी काय स्थिती ठेवावी तिथे सुरक्षित व योग्य वातावरण असावे यासठी नियम केले आहेत. भारत सरकारने त्या अनुषंगाने आपल्या कर्मचारी कामगारांसाठी काही नियम नव्याने करण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *