मुंबई : विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा भरविण्याचे ठरविले आहे. ही स्पर्धा १० ते १९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८ येथे होणार आहे. स्पर्धेप्रसंगी टाटा हॉस्पिटलचे नामवंत माजी क्रिकेटपटू डॉ. जाफरी यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. जखमी क्रीडापटूंना रुग्णालयीन सेवा त्वरित उपलब्ध करण्यासाठी विविध हॉस्पिटलचे क्रिकेटपटू सहकार्य करीत असल्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांनी स्पर्धेचे सातत्य कायम राखले आहे.
स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा बाद पध्दतीने आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीद्वारे आयोजित केली जाणार आहे. टॉप-१० संघांना रोख पुरस्कारासह आकर्षक चषक दिला जाणार आहे. सर्वोत्तम क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज तसेच प्रत्येक सामन्यातील दोन्ही संघातील उत्कृष्ट खेळाडूला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रुग्णालयीन सेवेत कायम स्वरूपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच डॉक्टर स्टाफला त्यांच्या हॉस्पिटल संघातून खेळता येईल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णालयीन क्रिकेट संघांनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा प्रदीप क्षीरसागर (७९७७४७१९४३) यांच्याकडे १८ जानेवारीपर्यंत संपर्क साधावा.
