शिवसेना (उबाठा) च्या शिष्यमंडळाने राजन विचारे, केदार दिघे, नरेश मणेरा यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त सौरभ राव यांची घेतली भेट

अनिल ठाणेकर
ठाणे : कचरा, पाणी, गरीब महिलांना व दिव्यांग बांधवांना योजनेचा न मिळालेला लाभ, सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात न आल्याने नागरिकांची सुरक्षा, अनधिकृत बांधकाम, क्लस्टर योजना, रेंटलच्या घरांची झालेली दुरवस्था, स्मशानभूमी तसेच शहरातील व घोडबंदर वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यानी नागरिकांना ग्रासले आहे. ठाणेकरांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढा अशी मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्यमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख नरेश मणेरा आदी शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आयुक्त सौरभ राव यांना लोकमान्य सावरकर नगर येथील जलकुंभावरील स्लॅब गेल्या २ वर्षापासून पडलेला आहे. तसेच धर्मवीर नगर येथे महानगरपालिकेच्या जागेवर वृक्ष छाटून २१ अनधिकृत गाळे बांधण्यात आले होते. तसेच ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाची झालेली दुर्दशा, ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्यांचे ढिगारे व इतर अशा अनेक समस्यांच्या छायाचित्रांच्या पुराव्यासहित वस्तुस्थिती दाखविण्यात आली.नुकताच पार पडलेल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत अनेक कोट्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा करून सत्ताधारांनी आपली पोळी भाजून घेतली. परंतु जनतेच्या पैशांचा चुराडा जास्त व सुविधा कमी असे चित्र सध्या ठाण्यात दिसत असल्याने स्वच्छ व सुंदर असणारे हे ठाणे सध्या डबक्याचे व कचऱ्याचे साम्राज्य तयार झालेले ठाणे बनले आहे. ठाणे महापालिकेची तिजोरी रसातळाला गेली त्यामुळे उगाचच नको त्या कामांवर उधळपट्टी थांबेल का ? असा सवाल त्यांनी आपल्या या पत्रामध्ये केला आहे. घोडबंदर वासियांना वाहतूक कोंडीचा फटका दररोज सोसावा लागतो. त्यामध्ये उपाययोजना करीत असताना नागरिकांना विश्वासात न घेता नागरिकांचा हक्काचा सर्विस रोड सुद्धा हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर विलीन करण्याचे नियोजन करीत आहेत. हा सर्विस रोड विलीन झाल्यास सर्विस रोड ला लागून असणाऱ्या अनेक सोसायट्या, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मंदिरे यांना मोठा अडथळा ठरणार आहे. गेटमधून आत बाहेर करताना अपघात होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. यासाठी शिवसेना नेते राजन विचारे तसेच संपर्कप्रमुख नरेश मनेरा यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सर्विस रोड बंद करू नका तो स्थानिक नागरिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. ठिकठिकाणी कामे सुरू करून सर्विस रोड बंद केलेला आहे. त्यामुळे सर्विस रोड जर हायवे पूर्व द्रुतगती महामार्गास विलीन झाल्यास मोठे आंदोलन घ्यावं लागेल असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. त्यावर आयुक्तांनी आठ दिवसांमध्ये एम एम आर डी ए सोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. तसेच पुढील समस्या मांडून त्याचा जाब प्रशासनाला राजन विचारे यांनी विचारला, बदलते ठाणे – या अभियानाचा गाजावाजा करण्यात आला. त्यासाठी शासनाचे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आले. मग कचरा आणि ठाण्यातील शौचालय आणि सौंदर्यकरण का बदलेले नाही. त्या कोट्यवधी रुपयांचे काय झाले ?तसेच सौंदर्यीकरण केलेल्या उड्डाणपुलाखालील पोलीस भरतीसाठी येणारे तरुण तरुणी व्यायम व कवायत करण्यासाठी येत असतात. परंतु ठेकेदारांनी त्या उड्डाणपुलाखाली त्यांची सामाने व त्यांच्या कॅबिने टाकून बकाल केलेले आहे. याला जबाबदार कोण ?. घनकचरा – ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये दररोज १३०० टन कचरा साठतो हा कचरा डायघर, मित्तल कंपाऊंड, कासारवडवली, सीपी तलाव, येथे साठविला जातो त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शासनाने ठाणे महानगरपालिकेला पडघा येथे ८५ एकर जागा भाड्याने दिली होती. त्या जागेवर कचरा अद्याप का साठविला जात नाही ?. पाणी – ठाण्यात सध्या गगनचुंबी इमारतीचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ठाण्यात दिवसेंदिवस लोक वस्ती वाढत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न जटिल होत आहे. नवीन ठाणे समजले जाणारे घोडबंदर भागात पाणी टंचाई दूर कधीपर्यंत होईल? यासाठी भविष्यात होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन स्वतंत्र धरण नसल्याने काळू व सूर्या धरणातून पाणी अद्याप का मिळविले नाही ? आज या पाणी टंचाईमुळे नागरिकांना टँकरसाठी जास्त पैसे मोजावे लागतात त्यामुळे त्यांचा धंदा जोरात असतो अशा टँकर माफियांवर कारवाई होणार का ?. सावरकर नगर येथे ३८ वर्षापूर्वीची जुनी पाण्याची टाकी बांधली होती त्याची दुरुस्ती न केल्याने गेल्या २ वर्षापासून टाकीचा स्लॅब पडून उघडा आहे. त्यासंदर्भात तेथील स्थानिकांनी वारंवार पत्रव्यवहार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. सुरक्षा –  नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाण्यात गृह विभागामार्फत सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात येणार होते त्याला कोणाच्या सांगण्यावरून दिरंगाई होत आहे ? स्मारक*- तमाम ठाणेकर व शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे स्मारक उपवन महापौर निवास येथे उभारण्यात येणार होते यासाठी ५ कोटीची तरतूदही अर्थसंकल्पात केली होती त्याचे काय झाले ? सध्या महापौर निवासचा वापर कोण करीत आहे ? त्यांच्यावर कारवाई होणार का?. योजना – दिव्यांग आणि गरीब महिलांना अनुदान देण्याची घोषणा झाली, मग अद्याप त्याचे पैसे का दिले नाही. आणि दिव्यांगांच्या अनुदानात निम्मे पैसे देण्याची वेळ महापालिकेवर का आली ? त्यांना प्रत्येकी २४ हजार देले पाहिजे. रस्ते – ठाणे शहरात रस्त्यांमध्ये डीवायडरमुळे वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक वाढत चाललेले आहेत. त्यावर काय उपाययोजना केली . सर्विस रोटर – घोडबंदर पट्ट्यात दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या सुविधांसाठी केलेला सर्विस रोड हा आता हायवे पूर्व द्रुतगती महामार्गास विलीन करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सोसायटीचा गेट हायवे पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडल्याने नागरिकांना सोसायटी मधून आत – बाहेर करताना अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्या सोसायटीमध्ये घुसू शकतात. त्यामुळे मोठी हानी नागरिकांना पोहोचू शकते. तसेच सोसायटीच्या गेट समोर वाहने ही उभी राहू शकतात. तसेच या सर्विस रोड खालून अनेक महापालिकेच्या जलवाहिन्या गेल्या आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यासाठीही जागा उरणार नाही. याचा विचार ना प्रशासनाने केला ना सत्ताधाऱ्यांनी केला. तसेच काही ठिकाणी विकासकांच्या कामांमुळे सर्विस रोड गेले दोन वर्ष खड्ड्यात पडलेला आहे. परंतु अद्याप त्यावर कोणतीही  कारवाई झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. घोडबंदर स्मशानभूमी – घोडबंदर पट्ट्यात भाईंदर पाडा येथे सर्व धर्मीय स्मशानभूमीचे काम पाच वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले होते. परंतु अद्याप या जागेवर कोणतीही काम सुरू न झाल्याचे निदर्शनास येत आहे. या जागेशेजारी असणाऱ्या विकासाकाने एफएसआय व टीडीआर मिळावा यासाठी फक्त कागदोपत्री याच्यावर स्मशानभूमीचे आरक्षण टाकले. 37000 चौरस मीटर या स्मशानभूमीच्या जागेवर कोणतेही बांधकाम अद्याप झालेले नाही अशी बाब निदर्शनास आली आहे. या कामाची सुरुवात कधी करणार ?. ठाणेकरांना महापालिकेच्या स्मशानभूमीत मोफत दहनविधी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अर्थसंकल्पात देण्यात आले. यासाठी २ कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली. मग ही सुविधा अद्याप का देण्यात आली नाही ? ती सुविधा मिळणारं आहे की नाही ?. अनधिकृत बांधकाम* -ठाण्यातील घोडबंदर पट्ट्यात बाळकुम, कापूरबावडी, वागळे इस्टेट, सावरकर नगर, या परिसरात सध्या अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात सुरू आहे. धर्मवीर नगर येथे तर वृक्षतोड करून महापालिकेच्या जागेवर सर्रासपणे २१ गाळे बांधले आहेत. यासंदर्भात धर्मवीर नगर जनहित सेवा समितीने तक्रार सुद्धा केली होती. परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. दिवा, मुंब्रा, कळव्यासह ठाणे शहर आणि घोडबंदर रोडवरील बेकायदेशीर बांधकामे उभी आहेत. या बांधकामांना कोण पाठीशी घालत आहे. या बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ का केली जाते. कायमस्वरूपी घरे – ठाणे शहराच्या विकासासाठी ज्यांनी आपली जागा सोडली त्यामुळे त्या जागेवर उत्तम उद्यान रस्ते रुंदीकरण व इतर सुविधा नागरिकांना मोठ्या प्रमाणात मिळाल्या परंतु त्यांना त्यांच्या जागेच्या मोबदल्यात अद्याप त्यांना घरे मिळालेली नाहीत. जी घरे रेंटल मध्ये बांधलेली आहेत त्यांची दुर्दशा अत्यंत बिकट झाली असल्याने तेथे कोणी राहत नाही. त्यामुळे सुमारे 2000 हून अधिक घरे त्या ठिकाणी ओसाड पडलेली आहेत. त्या ठिकाणी चरस, गांजे घेणाऱ्यांचे अड्डे बनले आहेत. त्या घरांमधील नळे व इतर वस्तू चोरल्या जाऊन उघडी पडलेली आहेत. परंतु हीच घरे दुरुस्ती करून त्यांना कायमस्वरूपी दिल्यास त्या इमारतीची देखभाल दुरुस्ती ही ते करू शकतील परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. क्लस्टर योजना – झोपडपट्टी पुनर्वसन योजना बंद करून त्या ठिकाणी नागरिकांच्या विरोधात जाऊन क्लस्टर योजना राबविण्याचे काम जोरदार सुरू आहे. या समस्या मांडून शिवसेना नेते राजन विचारे यांनी आयुक्त सौरभ राव यांना नागरिकांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घ्या कोणी लोकप्रतिनिधी सांगतो म्हणून तुम्ही ते करू नका आपण एक जबाबदार प्रशासक म्हणून काम करा व ठाणेकरांना समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढा अशी मागणी विचारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *