राजेंद्र साळसकर
मुंबई : मला जेलमध्ये जावे लागले तरी चालेल परंतु काही झाले तरी मी मुंबई मनपा कामगारांचा गिरणी कामगार होऊ देणार नाही, असे उदगार म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी नुकतेच येथे काढले.ते म्युन्सिपल मजदूर युनियनने संपूर्ण महाराष्ट्रातील मनपा व नपा च्या कामगाराच्या वारसा हक्क लढ्याला मिळालेल्या यशाबद्दल परेल येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यासमोर बोलत होते.
याप्रसंगी अॅड.हरिष बाली, अॅड.बळीराम शिंदे,संजय वढावकर,अॅड.सुरेश ठाकूर,म्युन्सिपल मजदूर युनिययनचे सरचिटणीस वामन कविस्कर,कार्याध्यक्ष यशवंत देसाई, कोषाध्यक्ष शरद राघव तसेच अनिल पाटील,गौतम खरात व संतोष पवार आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
अशोक जाधव आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,मुंबई मनपा कामगारांच्या बोनसबाबत बोलणी करण्यासाठी आयुक्त चहल यांच्याकडे गेलो होतो तेव्हा चहल साहेब आम्हाला म्हणाले की,तुम्हाला आता बोनस देऊ परंतु एक वर्षानंतर पगार,बोनस व पेन्शन द्यायला मिळणार नाही.तेव्हा आम्ही त्यांना बोललो की,साहेब असं का बोलता.त्यावर ते म्हणाले की, सरकारने आम्हाला अडीच लाख हजार कोटींची भांडवली कामे सांगितली होती पण ख-या अर्थाने आता दोन लाख ऐंशी हजार कोटींची कामे आता काढायला सा़गितली आहेत. परिणाम काय झाला, त्यांनी हवा तसा पैसा ओतण्याचं काम केलं.कोस्टल रोडला पंधरा हजार कोटी रूपये टाकले,एमएमआरडीए ला दहा हजार, पंचवीस हजार टाकले, बँकेतून ९२हजार कोटी काढून घेतले.आज महापालिका अस्तित्वात आल्यापासून एक रूपयाही कर्ज घेतलं नव्हतं त्या महापालिकेनं आता दीडलाख हजार कोटी रूपयांचं कर्ज काढलं आहे.मग मला सांगा त्या बँकेचं कर्ज पहिलं भरणार की तुमचा पगार देणार ? असं जर घडलंं तर तुम्हाला एक तारखेला जो पगार मिळतो तो तुम्ही एकमेकांना विचाराल आठ तारीख,दहा तारीख आली,तुझ्या खात्यात पगार आला काय? या सरकारने गिरणी कामगारांचं वाटोळं केलं पण तुमचा मी गिरणी कामगार व्हायला देणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.भले मला जेलमध्ये जावे लागले तरी चालेल पण मी तुमचा गिरणी कामगार व्हायला देणार नाही.त्यासाठी आता आम्ही संघटनेचे पदाधिकारी एकत्र बसून एक तारीख ठरवून मनपा आयुक्तांना नोटीस देणार आहोत,भांडवली काम हटाव आणि महापालिका कामगार बचाव,असे आवेशपूर्ण उदगार त्यांनी यावेळी काढले.
