कल्याण : अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात संपन्न झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी जगन्नाथ शिंदे यांच्या आयुष्यावरील रथ जगन्नाथाचा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तर एकाच दिवशी 80 हजारहून अधिक रक्तदान केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डबूक मध्ये नोंद करण्यात आली असून त्याचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले. जगन्नाथ शिंदे केमिस्ट रत्न म्हणून संपूर्ण देशात परिचित आहेत. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट महासंघाचे अध्यक्ष आहेत. तुमचा शतकमहोत्सवी सोहळा साजरा करण्याची संधी आम्हाला मिळावी एवढीच इच्छा याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केली. कोरोना काळात अप्पा शिंदे यांनी केलेलं काम कधीही विसरता येणार नाही. रेमडेसिवीर यांसारखी त्यावेळी दुर्मीळ झालेली औषधे त्यांनी उपलब्ध करून दिली. सर्वसामान्यांच्या जीवन मरणात महत्त्व असलेल्या औषधांचा पुरवठा करूनही त्यांची नाळ कायमच सर्वसामान्य नागरिकांशी जोडलेली आहे. एका दिवसात ८० हजार बाटल्या रक्त त्यांनी जमा करून दाखवले होते. त्यामुळे आप्पा तुम्ही यापुढेही कायम दवा देत रहा आणि दुवा घेत रहा असे सांगत एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड, आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त इंदूराणी जाखड आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.