आपण देशात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनाचा उत्सव साजरा करण्याच्या तयारीत होतो तेंव्हा म्हणजे शनिवार व रविवारच्या उत्तर रात्री पश्चिम आशियावरील युद्धाचे ढग अधिक गडद झाले. इराकच्या भूमीवरून साडे तीनशे ड्रोन व क्षेपणास्त्रांचा वर्षाव इस्त्रायलच्या भूमीवर कऱण्यात आला. पण इस्त्रायलने उभ्या केलेल्या पोलादी पडदा संरक्षक कवचाने काम केले. 99 टक्के ड्रोन व क्षेपणास्त्रांचा संहार इस्त्रायली क्षेपणास्त्रांनी हवेतच केला. जे थोडे इस्त्रायली हद्दीत आदळले त्याने फारसे नुकसान झाले नाही. पण इतक्या थेट हल्ल्यानंतर आता इस्त्रायल प्रती हल्ला कऱण्याच्या तयारीत असल्याने जगाची धडधड वाढली आहे. जगाच्या पाठीवर आधीच दोन युद्धे धुमसत असताना आता तिसऱ्या संघर्षाच्या ठिणग्या उडू लागल्या असून त्याने भारतालाही चिंता वाटावी अशी स्थिती पैदा होते आहे. एक युद्ध गेले सव्वा दोन वर्षे धुमसते आहे. युक्रेनवर रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये हल्ला चढवला. आता तिथल्या बातम्याही फारशा वृत्तपत्रांतून वा वृत्तवाहिन्यांमधून झळकत नाहीत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्त्रायलच्या कुशीतील गाझा पट्टीमधून काही अतिरेकी अचानक सुरक्षाकवच भेदून इस्त्रायलच्या हद्दीत घुसले. त्यांनी जवळपास साडे तीनशे इस्त्रायली महिला पुरूष व मुलांना पकडून गाझा पट्टीत नेले. या ओलिसांची सुटका करण्याच्या बदल्यात इस्त्रायलला व त्यांचे पाठीराखे असणाऱ्या अमेरिकेला चांगलंच नमवता येईल असा या अरब अतिरेक्यंचा हिषेब होता. पण झालं भलतंच ! महिनाभराची पूर्वसूचना अरबांना व जगाला दिल्यानंतर इस्त्रायलने गाझा पट्टीवर थेट आक्रमण सुरु केले. इस्त्रायलला छळणाऱ्या गनिमांचा सर्वनाश करणे, हमास या दहशतवाद्यांचा निःपात करणे हेच उद्दीष्ट इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी आपल्या डोळ्यांपुढे ठेवले आहे. त्यांच्या पाठीशी इस्त्रायलमधील तमाम जनता आणि सारा विरोधी पक्षही एकवटला आहे. तिथे सध्या सर्व पक्षीयांचे आपत्कालीन सरकार स्थापन झाले आहे. कोणीच विरोधक नाहीत. सारेच देशासाठी एकत्र आले आहेत. त्यांचा कणखर निर्धार आहे तो हमास या दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याचा. गाझा पट्टीत उत्तरेकडून आक्रमण केल्यानंर इस्त्रायल वाटेतील सारी गावे खेडी आणि शहरं उध्वस्त करीत पुढे घुसत आहे. हमास आता समझोत्याच्या बाता करू लागले आहे. पण जोवर सारे ओलीस सुखरूप इस्त्रायलच्या भूमीत परत येणार नाहीत तोवर हे युद्ध थांबणार नाही अशी घोर प्रतिज्ञा नेतन्याहू यांनी केली असून त्याचेच पालन ते करतच आहेत. या संघर्षातून काही उपसंघर्षही पैदा झाले आहेत. इस्त्रायल विरुद्ध इराक, इस्त्रायल विरुद्ध इराण अशा काही संघर्षांना तोंड फुटले आहे. इराक ही या साऱ्या पश्चिम आशिया व आखाती क्षेत्रातील अशी एक ताकद आहे की जे सातत्याने इस्त्रायलच्या विरोधात अतिरेकी तयार करत आहेत. पोसत आहेत. हिजबोल्ला हा त्यातलीच एक अतिरेकी गट. मुळात इराकी व इराणी सरकारे यांवर मुस्लीम दहशतवाद्यांचेच वर्चस्व आहे. इराणच्या रिल्होल्युशनरी इराणी गार्ड या सैन्यातील अनेक कमांडर हे जगाच्या दृष्टीने अतिकेरेक्यांचे मोऱ्हकेच आहेत. त्यातील दोघांचा खात्मा जॉर्डनची राजधानी दमास्कस येथली इराणी दूतावासात केला गेला. या दूतावासीची इमारत ही दूर प्रक्षेपित अशा क्षेपणास्त्राच्या दणक्यात 1 एप्रिल रोजी जमीनदोस्त झाली होती आणि त्यात हे दोन इराणी सैन्य अधिकारी ठार झाले होते. तो हल्ला इस्त्रायलच्या भूमीवरील अमेरिकी तळावरून केला गेला असा आरोपच इराणने केला होता. आयातोल्ला खामेनी हे सध्या इराणचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी तसेच इराणच्या पंतप्रधानांनी इस्त्रायलचा बदला घेतला जाईल, शिक्षा केलीच जाईल, असे जाहीर केले आहे. इराण इस्त्रायलवर तसेच इस्त्रायलमधील अमेरिकी लष्करी तळांवर हल्ला करणार हे स्पष्ट होताच भरातासह अनेक देशांनी या दोन्ही देशांतील भारतीय नागरिकांना भारतीय दूतावासांशी संपर्क साधण्याचे व सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. त्याच वेळी भारतीय पर्यचक व प्रवाशांनी इस्त्रायल तसचे इराण या दोन्ही देशात सध्या जाऊ नये अशी सल्लावजा सूचनाही भारताच्या परराष्ट खात्याने जारी केली. इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्र डागल्याने जग पुन्हा एकदा अशांत झाले आहे. इस्रायलवरील हल्ल्याबाबत इराणने आधीच इशारा दिला होता. त्या नुसार, भारतासह अनेक देशांनी आपल्या नागरिकांना पश्चिम आशियायी देशांत जाण्यापासून रोखले होते. आता इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर भारताने आपली भूमिका जाहीर केली आहे. दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले असून या देशातील भारतीय समुदायांच्या संपर्कात असल्याचं इस्रायलमधील परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. भारताचे 90 हजारांपून अधिक नागरिक हे इस्त्रायलमध्ये आहेत. भारताने इस्त्रायलला बांधकाम क्षेत्रासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ पुरवण्याचे करार केले आहेत. त्यातील पंधराशे बांधकाम कामगारांचा जथ्था अलिकडेच इस्त्रायलला दाखलही झाला आहे. भारताला इस्त्रायल कडून संरक्षण साहित्या बरोबरच उच्च तंत्रज्ञानाची सुरक्षा साधनेही मिळत असतात. इराककडून भारत स्वस्त दरात व रुपया चलनात मोठ्या प्रमाणात खनिज तेल मिळवतो. आपल्यासाठी या दोन्ही देशांची मैत्री महत्वाची तर आहेच, पण तिथे संघर्ष भडकला तर आपल्याला नुकसान सहन करावे लागणार आहे. इराणमध्येही हजारो भरातीय अभियंते कामगार आहेत. जर इस्त्रायलने प्रतीहल्ला चढवला तर या साऱ्या मंडळींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न भारता पुढे उभा राहणार आहे. परवाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्त्रायनने प्रतुत्तर देऊ नये अशी विनंती, असा धावा संयुक्त राष्ट्रसंघानेही केला आहे. तशीच विनंती भारत सरकारनेही इस्त्रायलला केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की “इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या शत्रुत्वाबद्दल आम्ही गंभीरपणे चिंता व्यक्त करत आहोत. या प्रदेशातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे” तणाव कमी कऱण्याची पावले दोन्ही बाजूंनी तात्काळ उचलावीत , संयम बाळगावा असे भारताचे आवाहन आहे. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. या प्रदेशातील आमचे दूतावास भारतीय समुदायाच्या संपर्कात आहेत. तत्पूर्वी इस्त्रायलने १ एप्रिल रोजी इराणच्या सीरियामधील दूतावासावर हल्ला केल्यानंतर या दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यात दोन लष्करी अधिकाऱ्यांसह ‘रिव्हॉल्यूशनरी गाडर्स्’चे सात कर्मचारी मारले गेले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी इराणने दिल्यानंतर शनिवारी इस्रायलशी संबंधित जहाज ताब्यात घेण्यात आले. इराणने ताब्यात घेतलेल्या पोर्तुगीज मालवाहू जहाजात १७ भारतीय कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीय नागरिकांची सुरक्षा, कल्याण आणि सुटका सुनिश्चित करण्यासाठी तेहरान आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी राजनैतिक माध्यमांद्वारे इराणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे, असे परराष्ट्र खात्याच्यावतीने सांगितले गेले. इराणच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तेल अवीव येथील लष्करी मुख्यालयात इस्रायलच्या युद्ध मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. दरम्यान, इराणने क्षेपणास्रे डागल्याने इस्रायलने संभाव्य परिस्थितीसाठी सुरक्षा यंत्रणा तैनात केल्या आहेत. तसंच कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीसाठी इस्रायल सज्ज असल्याचंही सांगण्यात आलं आहे. बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि इतर राष्ट्रांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. इराणने ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले असले तरी इस्रायलला प्रत्युत्तर देऊ नका, असे आवाहन जागतिक नेत्यांनी केले आहे. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड कॅमेरॉन यांनी ब्रिटन प्रत्युत्तराच्या हल्ल्याला समर्थन देत नसल्याचे सांगितले, तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला प्रयुत्तर न देण्यासंबंधी पटवून देण्यात येणार असल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलिया, जर्मनी तसेच अमेरिकेनेही इराणबरोबरच्या व्यापक युद्धात इस्त्रायलला समर्थन देता येणार नाही हे स्पष्ट केले. दरम्यान हा अतिशय संवेदनशील प्रदेश आहे. अशा प्रकारे परिस्थिती चिघळते आणि शत्रुत्व वाढते तेव्हा आम्हाला चिंता वाटते. त्यामुळे मी इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन आमिर-अब्दोल्लाहिया आणि इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्रायल कात्झ यांच्यासी पोनवरून चर्चा केली व भारताची चिंता प्रकट केली असे भारताचे पररा,ट्र मंत्री एस जयशंकर यंनी स्पष्ट केले हे.