मुंबई : इस्त्रीचे कपडे घातले की आपला रुबाब न्याराच असतो. मात्र आता बिना इस्त्रीचे कपडे घालावे लागत असल्याने काही जणांचा रुबाब जरा कमी झाला आहे. याला कारणही कडक उन्हाळा आहे.
काहीजण घरी कपडे इस्त्री करतात , मात्र काहीजण परटा कडे ( लॉन्ड्री वाला ) कपडे इस्त्री करण्यास देतात. मात्र आता कडक उन्हामुळे अनेक परीट दुपारी काम बंद करत आहेत. इस्त्री च्या वाफेमुळे त्यांना दुपारी काम बंद केले नाही तर उष्माघाताने त्यांचा जीव जाऊ शकतो.
कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर अनेक परीट गावी गेले आहेत तर काही परीट दुपारी काम बंद करून विश्रांती घेत आहेत. कपडे इस्त्री करून मिळण्यास विलंब होत असल्याने अनेकजण घरीच इस्त्री करत आहेत तर काहीजण बिना इस्त्री चे कपडे घाऊन बाहेर पडत आहेत. अर्जंट इस्त्री करके दे दो असे म्हणणाऱ्यांना आता दो दीन बाद आवो असे उत्तर परीट देत आहेत.
काही भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे परीट दादा सुद्धा काही करू शकत नाही. काही परीट कोळशाची इस्त्री घेऊन काम करत आहेत. काही परीट वातानुकुलीत ( AC) दुकान थाटून काम करत आहेत. मात्र विजेच्या लपंडावामुळे त्यांनाही जनरेटर चा आधार घ्यावा लागत आहे. जनरेटर , AC दुकान , कामगार , इतर खर्च पाहता दर वाढवले तर ग्राहक तुटतात म्हणून त्यांनीही उशिरा कपडे देणे सुरू केले आहे.
या महिन्यात अनेक परीट गावी जातात. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आदी भागातील परीट दोन महिने गावी जातात. त्याचा फटका कडक इस्त्रीच्या घडी वर झाला आहे.
