ठाणे : देशभरात सुरू असलेल्या लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य आवर्जून पार पाडावे, असे आवाहन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना केले आहे. शुक्रवारी सायंकाळी, महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी लावण्यात आलेल्या ‘मी मतदानाचा हक्क बजावणार’ या स्वाक्षरी फलकावर आयुक्तांनी स्वाक्षरी केली तसेच, सेल्फी स्टॅण्डचे उद्घाटनही केले.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आदींनी या स्वाक्षरी फलकावर सही केली.जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सभागत वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यादृष्टीने ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविका यांच्या माध्यमातून मतदानाविषयी जागृतीचे अभियान सुरू केले आहे.
