शाब्बास सई !
महाराष्ट्राच्या सई जाधवची ऐतिहासिक झेप
९३ वर्षांत प्रथमच भारतीय टेरिटोरियल आर्मीत असणार महिला अधिकारी
संपदा राणे-सावंत
डेहराडून / मुंबई : भारतीय सैन्याच्या इतिहासात नवा सुवर्णअध्याय रचत महाराष्ट्राच्या सई जाधव यांनी अवघ्या २३ व्या वर्षी एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे. इंडियन मिलिट्री अकादमी (IMA), डेहराडून येथून यशस्वीरीत्या पास-आउट होत त्यांनी भारतीय टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून कमीशन मिळवले आहे. विशेष म्हणजे, ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच टेरिटोरियल आर्मीमध्ये महिला अधिकारी म्हणून कमीशन मिळवण्याचा मान सई जाधव यांना मिळाला आहे.
सन १९३२ साली स्थापन झालेल्या IMA मधून आजवर हजारो अधिकारी घडले, मात्र प्रथमच एका महिलेला हे गौरवाचे स्टार्स खांद्यावर लावण्याचा मान मिळाला आणि तो मान एका मराठी मुलीला मिळाला, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
ही केवळ वैयक्तिक यशोगाथा नाही, तर देशातील असंख्य मुलींसाठी आत्मविश्वास, धैर्य आणि स्वप्नांची दिशा दाखवणारा प्रेरणादायी टप्पा आहे. सई जाधव या देशसेवेचा वारसा पुढे नेणाऱ्या जाधव कुटुंबातील चौथी पिढी ठरल्या आहेत, बेळगाव येथे शिक्षण आणि जडणघडण झालेल्या, मूळ कोल्हापूरच्या सई यांचे पणजोबा ब्रिटिश सेनेत, आजोबा भारतीय सैन्यात, वडील मेजर संदीप जाधव यांच्या सेवेच्या परंपरेला पुढे नेत सई यांनी सशस्त्र दलात नवा इतिहास घडवला आहे.
ही ऐतिहासिक कामगिरी केवळ सई जाधव यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या संरक्षण क्षेत्रात महिलांच्या सहभागाला नवी दिशा देणारा हा क्षण मानला जात आहे.
इंडियन मिलिट्री अकादमी, डेहराडून येथील प्रशिक्षण अत्यंत कठीण आणि शिस्तबद्ध मानले जाते. शारीरिक कसोटी, मानसिक ताणतणाव, नेतृत्वगुण, युद्धसज्जता आणि राष्ट्रसेवेची तीव्र भावना – या सर्व कसोट्यांवर सई जाधव यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करताना दाखवलेली चिकाटी आणि आत्मविश्वास सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
सई जाधव यांच्या यशामुळे देशातील असंख्य तरुणींना संरक्षण दलात करिअर करण्याची नवी प्रेरणा मिळणार आहे. “महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत” हा विश्वास त्यांनी आपल्या कर्तृत्वातून ठामपणे अधोरेखित केला आहे.
