गडचिरोलीतील स्वप्न दुबईत साकार
श्वेता कोवेची गडचिरोलीतील स्वप्न दुबईत साकार पॅरा तिरंदाजीत सुवर्णभरारी
दुबई: येथे पार पडलेल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी श्वेता कोवे या दिव्यांग तरुणीने ‘पॅरा तिरंदाजी’ स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदकांची कमाई करत केवळ भारताचाच नव्हे, तर महाराष्ट्रासहीत दुर्गम गडचिरोली जिल्ह्याचाही झेंडा जागतिक स्तरावर अभिमानाने फडकावला आहे. संघर्षातून घडलेल्या या यशकथेने प्रत्येक डोळे पाणावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्वेताचे तीच्या यशासाठी कौतुक केले आहे.
वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत असताना, त्याच वेळी श्वेताच्या स्वप्नांना पंख देण्याचे कठीण पण धैर्याचे काम केले. अपार कष्ट, त्याग आणि मायलेकीतील नात्याची ताकद या साऱ्यांच्या जोरावर श्वेताने जीवनातील प्रत्येक अडथळ्याला सामोरे जात स्वतःला सिद्ध केले.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १४ देशांच्या खेळाडूंशी थेट सामना करत श्वेताने दाखवलेली एकाग्रता, संयम आणि अचूकता केवळ पदकांपुरती मर्यादित राहिली नाही; तिने असंख्य मनांमध्ये आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित केली. “मी एक दिवस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार,” हे तिचे स्वप्न आता अधिक ठाम झाले आहे.
दुर्गम भागात जन्मलेली, साध्या परिस्थितीत वाढलेली श्वेता आज हजारो मुला-मुलींसाठी आशेचा किरण ठरली आहे. अपंगत्व हा अडसर नसून जिद्द आणि मेहनत हीच खरी ताकद आहे, हे तिच्या कामगिरीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
