शिल्पकलेचे तपस्वी

राम सुतारांचे निधन

मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार तपस्वी राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम सुतार यांनी जगभर २०० हून अधिक शिल्प बनवली आहेत. दिल्लीत संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतारांनी साकारलेली शिल्प आहेत. भारतातीलच नव्हे तर जगभरात आकर्षण ठरलेले गुजरातमधिल सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळाही राम सुतार यांनीच साकारला होता.

राम सुतार यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सारख्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र अभिमान गीत देखील गायले होते.

काही दिवसांपूर्वी अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं, तो पुतळा देखील राम सुतार यांनी साकारला होता. राम सुतार यांच्या पुतळ्यामधली कलाकुसर, त्यांच्या शिल्पामधली बारकाई हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्राचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

जगातील सर्वात उंच, १८२ मीटर उंचीचा स्टॅच्यू ऑफ युनिटी साकारल्यामुळे राम सुतार यांना जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली.

राम सुतार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावात झाला. प्रारंभी श्रीराम कृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिल्पकलेचे प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये औपचारिक शिक्षण पूर्ण केले.

१९५९ साली राम सुतार यांनी दिल्लीत माहिती व दूरसंचार मंत्रालयात नोकरी स्वीकारली. मात्र काही वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देत पूर्णवेळ शिल्पकार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. शिल्पकलेतील प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी दिल्लीमध्ये स्वतःचा शिल्पकलेचा स्टुडिओ उभारला.

राम सुतार यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पुतळे साकारले. स्टॅच्यू ऑफ युनिटीचा संपूर्ण डिझाईन त्यांनीच तयार केला असून, हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि उल्लेखनीय कार्य मानले जाते. भारतीय कला आणि संस्कृतीच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेत १९९९ साली पद्मश्री आणि २०१६ साली पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. सुमारे ६० वर्षांच्या कारकिर्दीत राम सुतार यांनी ५० हून अधिक भव्य मूर्ती निर्माण केल्या. यामध्ये संसद भवनातील महात्मा गांधी यांच्या मूर्तीचा विशेष उल्लेख केला जातो. या मूर्तीच्या प्रतिकृती इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया यांसारख्या देशांमध्येही पाठवण्यात आल्या आहेत.

प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९५२ साली त्यांनी प्रमिला यांच्याशी विवाह केला. त्यांचा मुलगा अनिल सुतार हाही एक प्रसिद्ध मूर्तिकार आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील शिक्षणानंतर १९५३ मध्ये राम सुतार यांनी मेयो गोल्ड मेडल पटकावले. १९५४ ते १९५८ या काळात त्यांनी अजिंठा आणि वेरूळ लेणी येथे ऐतिहासिक कोरीव काम केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *