ठाकरे बंधूंचा ‘फॉर्म्युला’ ठरला
ठाकरे बंधूंची आठ जिल्ह्यात युती
० मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ जागा लढवणार
० मनसेला ९० जागांची ऑफर
० २३ डिसेंबरला जागा वाटपाची घोषणा होणार
स्वाती घोसाळकर
मुंबई : राज्यातील महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकींसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूतील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. ठाकरे बंधू राज्यातील आठ जिल्ह्यात युती करणार आहेत. इतकेच नव्हे तर मुंबईतील जागावाटपाचाही फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना १२५ जागा लढणार आहे तर राज ठाकरे यांची मनसे ९० जागा लढण्याची शक्यता आहे. काही जागा मित्रपक्षांनाही सोडण्यात येणार आहेत.
येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या निवडणूकीत ज्या प्रभागांमध्ये मराठी मतदारांचे वर्चस्व आहे, तिथे ५०-५० टक्क्यांचा फॉर्म्युला राबवला जाणार आहे. तर उर्वरित प्रभागांमध्ये ६०-४० किंवा ताकदीनुसार जागांची विभागणी केली जाईल. विशेष म्हणजे, मुस्लिम बहुल भागांत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आपले उमेदवार उभे करेल, असेही समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या युतीची अधिकृत घोषणा २३ डिसेंबर २०२५ रोजी होण्याची शक्यता आहे. या दिवशी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर येऊन मुंबईच्या मतदारांना साद घालू शकतात. गेल्या दोन दशकांपासून स्वतंत्र राजकारण करणाऱ्या या दोन भावांनी ‘मुंबई’ आणि ‘मराठी अस्मिता’ वाचवण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ‘महायुती’च्या वाटणीत एकमेकांचे पाय खेचत आहेत. भाजपाने शिंदे शिवसेनेला ५० जागांवर लढण्याची ऑफर दिली आहे. तर शिंदेना १०० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. भाजपा १३० ते १५० जागा लढवण्यावर ठाम आहे. यामुळे एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १२५ जागा सुटल्या तर शिंदेंच्या गोटात मोठी खळबळ उडणार आहे. मुंबई कोणाची आणि खरी शिवसेना कोणाची हे प्रश्न सोडविण्यासाठी आता मुंबई महापालिकेची निवडणूकच उत्तरदायी ठरणार आहे.
