ठाणे : ॲथलेटिक्स, कबड्डी, खो-खो आदी खेळांचे राज्यस्तरीय पंच आणि चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचाचे संस्थापक दिवंगत सुभाष बाळकृष्ण कोळी यांनी सुरू केलेला महाराष्ट्रातील पहिला कोळी महोत्सव येत्या रविवार, २८ डिसेंबर रोजी होणार आहे. पूर्व ठाण्यातील चेंदणी बंदरावर संध्याकाळी ६ ते १० वाजेपर्यंत रंगणारा “उत्सव परंपरेचा कोळी संस्कृतीचा सन (सण) चेंदणी गावाचा” महोत्सवाचे यंदा २० वे वर्ष असल्याचे प्रमुख आयोजक निशा – विक्रांत कोळी दांपत्याने सांगितले.
कोळी गीतांचा बादशाह श्रीकांत नारायण, लावणी गौरव पुरस्कार विजेती प्रनद्या कोळी – भगत, आंतरराष्ट्रीय सॅक्सोफोन वादक नागेश कोळी, ६ नृत्य पथके, १४ जणांचा वाद्यवृंद, ८ गायक, मत्सप्रदर्शन, कोळी पद्धतीने बनवलेले शाकाहारी, मांसाहारी पदार्थ, होड्यांचे प्रदर्शन हे यंदाच्या कोळी महोत्सवाचे वैशिष्टे असणार आहे. पारंपारिक कोळी वेशातील सवाद्य मिरवणुकीने सुरुवात होणाऱ्या कोळी महोत्सवाचे उद्घाटन माधुरी – महेंद्र कोळी, शुभदा – जयंत कोळी आणि सुमती – प्रल्हाद नाखवा या तीन दांपत्याच्या हस्ते होईल. यावेळी योग प्रशिक्षक मिनाक्षी – रमेश कोळी दांपत्य, माजी राज्यस्तरीय खो खो पंच, भजन गायिका चंद्रप्रभा तांडेल, सर्जन डॉ. श्रेयल कोळी, वास्तुविशारद वैष्णवी ठाणेकर, शालांत परीक्षेत १०० टक्के मार्क मिळवणारी सान्वी ठाणेकर, युंगधरा कोळी, महाराष्ट्राची सौंदर्यवती, मलबार गोल्ड सर्वोत्तम मॉडेल पुरस्कार विजेती युगंधरा कोळी, सागरी जलतरणात छाप पाडणारी धृती कोळी यांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या कोळी महोत्सवात आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचाने केले आहे.
