पर्यटकांचा रविवार
ट्रॅफिक जाममध्ये
पुणे : नाताळ आणि आणि सरत्या वर्षातील शेवटच्या शनिवार, रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा आनंद घेऊन पुणे, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशा्ंना रविवारी सायंकाळी अडकून पडावे लागले. मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा, खंबाटकी घाट, कात्रज घाट, नवले पूल, चांदणी चौंक आणि बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्याने पर्यटकांना तासंतास गाडीत बसावे लागल्याने प्रवाशांना पुन्हा मनस्तापाला सामोरे जावे लागले.
नाताळ आणि वर्षअखेरच्या शेवटच्या शनिवार, रविवारची सुट्टीमुळे मुंबई, पुण्यातील पर्यटकांनी थंडीच्या वातावरणात पाचगणी, वाई तसेच कोल्हापूर, कोकण, गोवा अशा पर्यटन स्थळांवर जाण्यास पसंती दिली होती. त्यामुळे गुरूवारी (२५ डिसेंबर) नाताळ सुट्टी आणि शनिवार, रविवार या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे द्रूतगती महामार्ग आणि मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांना अडकून पडावे लागले होते. चार दिवसांच्या सुट्ट्यांनंतर पुन्हा माघारी परतताना साताऱ्यातील खंबाटकी घाट, कात्रज घाट, नवले पूल, वारजे, चांदणी चौक आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुढच्या मार्गांवर वाहतुकीचा बोजवारा उडाला.
