Heading – पर्यटन हंगामात सतर्क राहून कारवाई करा

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

अशोक गायकवाड

रत्नागिरी : ३१ डिसेंबर तसेच सध्याचा पर्यटनाचा हंगाम पाहता सर्वच यत्रंनेने सतर्क राहून अंमली पदार्थांच्या विरोधात भरीव कारवाया कराव्यात, अशी सूचना निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला अपर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते. महामुनी यांनी सविस्तर आढाव दिला. जिल्हाधिकारी जिंदल यांनी विभागनिहाय तसेच उपविभागानुसार सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, कोस्टगार्डने बोटींची तपासणी करावी. येणाऱ्या ३१ डिसेंबर तसेच सध्याच्या पर्यटन हंगामाबाबत‍ पोलीसांसह सर्व यंत्रणांनी सतर्क राहून भरीव कारवाई करावी. पोलीसांनी पेट्रोलिंग वाढवून आपले गोपनीय नेटवर्क वाढविले पाहिजे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असणारी तडीपारीची प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी. शिक्षकांनाही सतर्क करावे. कृषी आणि वन विभागाने गांजाची लागवड होणार नाही यासाठी सतर्क रहावे. गांजा सेवन प्रकरणात, तो कुठून आणला जातो याबाबत मुळाशी जाऊन तपास करावा. जास्तीत जास्त कारवाया झाल्या पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *