‘ताज ‘ पंच तारांकित हॉटेल प्रकल्पाच्या कराराला विरोध…!
9 हेक्टर क्षेत्र वगळा: वेळागरवासियांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष….!
सिंधुदुर्ग : शिरोडा वेळागर इथल्या नियोजित ताज पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासाठी झालेला त्रिसदस्य करार हा भूमिपुत्रांना विश्वासात न घेता करण्यात आला असून प्रकल्पासाठीच्या संपादित जागे 41हेक्टर पैकी नऊ हेक्टर क्षेत्र वगळावे या मागणीवर आम्ही ठाम आहोत. या कराराला आमचा विरोध आहे असे शिरोडा -वेळागरवाडी शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे.
शिंदे सेनेचे माजी आमदार राजन तेली, वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन सादर केले.
यावेळी संघटनेचे राजेंद्र अंदुर्लेकर, सचिव हनुमंत गवंडी, महादेव अंदुर्लेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्याच आठवड्यात पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या दालनात जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री व सावंतवाडीचे शिंदे सेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरोडा वेळागर (ता. वेंगुर्ला) येथील नियोजित ताज पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाच्या त्रिसदस्य करारपत्रावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वी तत्कालीन पर्यटनमंत्री गिरीश महाजन हे याच हॉटेलच्या भूमिपूजनासाठी आले असता राजन तेली आणि जयप्रकाश चमणकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामस्थ व भूमिपुत्रांनी याला आक्षेप घेत तीव्र विरोध केला होता. त्यावेळी त्यांचेसोबत शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर उपस्थित होते.
शिरोडा- वेळागरवाडी, येथील पर्यटन विकासाकरिता शासनाकडे उपलब्ध असलेल्या विस्तीर्ण संपादित 41 हेक्टर क्षेत्रातून केवळ ९ हेक्टर क्षेत्र वगळण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणी बाबत महाजन यांनी सकारात्मक भूमिका घेत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्यापही झाली नसल्याचे निवेदनातून निदर्शनास आणण्यात आले असून त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक भूमिपुत्रांना डावलून व पूर्णपणे अंधारात ठेवून हे करारपत्र करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आम्ही गेली कित्येक वर्षे (1995 पासून ) 9 हेक्टर क्षेत्र वगळण्याची मागणी वेळोवेळी शासनाकडे करत आहोत.
या जमिनीवर आमचा उदरनिर्वाह आहे, माड बागायत आहे, दुबार पीक येणारी शेतजमीन आहे, काजूची झाडे आहेत, तसेच राहती घरे, मांगर, शौचालये, विहीरी, धार्मिक स्थळे आहेत. म्हणूनच आम्ही सदरचे केवळ ९ हेक्टर क्षेत्र वगळण्याची मागणी सुरुवातीपासून केलेली होती व ती आजही कायम आहे. आम्ही अल्पभूधारक शेतकरी असून, या क्षेत्राखेरीज आमच्याकडे अन्यत्र कुठेही, कोणतीही जमीन व उदरनिर्वाहाचे अन्य कोणतेही साधन नाही.
गेल्या 25 -30 वर्षात या मागणीसाठी अनेक आंदोलने,जल आंदोलन, उपोषणे झाली. मोर्चे, धरणे कार्यक्रम झाले. विधिमंडळात अनेक वेळा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. विधिमंडळाची समिती येऊन पहाणी करून गेली मात्र आजमितीपर्यंत हा प्रश्न सुटलेला नाही. आजही आमच्या डोक्यावर ही टांगती तलवार आहे असे शेतकरी,स्थानिक भूमिपुत्र व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शिरोडा ग्रामपंचायतीच्या २५/५/२०२४ रोजी झालेल्या ग्रामसमेत या विषयावर चर्चा होऊन जोपर्यंत आम्ही मागणी केलेले ९ हेक्टर क्षेत्र वगळण्यात येणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारच्या कामासाठी कोणतीही ना-हरकत देण्यात येऊ नये असा ठराव एकमताने संमत करण्यात आलेला आहे याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
