ठाणे जिल्ह्याचा वेटलिफ्टिंगमध्ये डंका
कल्याण : तळेगाव दाभाडे येथे २४ ते २६ डिसेंबरदरम्यान पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय युथ, ज्युनिअर व सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये ठाणे जिल्ह्याच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली. कल्याण मधील रिक्रेशन व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली असून जिल्ह्याच्या क्रीडा परंपरेला नवा जोर मिळाला आहे.
युथ गटात ४८ किलो वजनी गटात हर्षिणी प्रशांत चव्हाण हिने सुवर्णपदक पटकावले. ६३ किलो वजनी गटात साध्वी प्रल्हाद चौधरीने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ७७ किलो वजनी गटात खुशी सुधीर सकपाळ हिने रौप्यपदक मिळवले. मुलांच्या गटात पार्थ पाल (६० किलो) याने रौप्यपदक, मित गदल्या घोडे (७१ किलो) याने सुवर्णपदक, तर राजस मनीष शिंदे (८८ किलो) यानेही सुवर्णपदक पटकावत ठाणे जिल्ह्याच्या पदक तिजोरीत भर घातली. या यशामागे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते सुनील दळवी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांना मिथिल चौधरी तसेच रिक्रेशन व्यायाम शाळेच्या संपूर्ण समितीचे भक्कम सहकार्य लाभत आहे.
याच स्पर्धेदरम्यान नाना सिंहासने यांच्या स्मरणार्थ विशेष सत्कार कार्यक्रम पार पडला. सौम्या सुनील दळवी हिने ज्युनिअर कॉमनवेल्थ स्पर्धेत क्लीन अँड जर्क प्रकारात १०० किलोपेक्षा अधिक वजन उचलल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला. हा सत्कार अश्वमेध वेटलिफ्टिंग फाऊंडेशन, ठाणे यांच्या वतीने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या मधुरा सिंहासने-टोळे, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर आणि कार्यकारी सचिव प्रशांत बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला.
