सम्राट अशोक विद्यालयात विज्ञान रांगोळी प्रदर्शन संपन्न
कल्याण : पाली भाषा प्रचारआणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय, सेंट वाय. सी. इंग्लिश स्कूल व विपश्यना बालविहार यांच्या इंग्रजी व मराठी माध्यमाचे दोन दिवसीय रांगोळी,विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. प्रदर्शन उद्घाटन समयी प्रमुख मान्यवर म्हणून पंचेचाळीस सेकंदात रांगोळी पूर्ण करून वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या जुन्नर घोलवड च्या पूजा काळे, उद्योगपती रमेश गायकवाड,संस्थेचे अध्यक्ष पी.टी धनविजय उपस्थित होते.
पूजा काळे यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेली रांगोळी मैदानावर काढत विद्यार्थी व पालकांचे लक्ष वेधत प्रोत्साहित केले. काळे आपल्या मनोगतात म्हणाल्या मी एक शेतकरी परिवारातील आहे. माझे पतीही शेतकरी आहेत. मला माझ्या वडिलांकडून रांगोळीचे मार्गदर्शन मिळाले दृढ विश्वास, इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर आणि परिवाराने दिलेली साथ म्हणूनच मी वर्ल्ड रेकॉर्ड करू शकली. मुलांनो तुम्ही सुद्धा आयुष्याचे ध्येय समोर ठेवा शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत चला आणि आपल्याला आवडणाऱ्या कलेतून पुढे जा.
प्रदर्शनात ठेवलेले प्रकल्प तसेच रांगोळी यामधून माध्यम व विभाग निहाय प्रथम, द्वितीय क्रमांक काढले निरीक्षक म्हणून सहशिक्षक दिलीप गायकर, संजय वाघ, व दिपाली इंगळे यांनी काम पाहिले. शाळेचे पालक विद्यार्थी व परिसरातील पालकांनी प्रदर्शन पाहत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष पी.टी. धनविजय म्हणाले सर्व विभागाचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या सहकार्याने उत्तम प्रदर्शन पार पडले. माध्यमिक चे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. सहशिक्षक गणेश पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर प्राथमिक मुख्याध्यापिका सुजाता नलावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
