भाजपा स्वबळावर 0 एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची युती
नाशिक : मुंबई पुणे ठाणे नंतर सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिक महानगर पालिकेत महायुतीत फुट पडली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष युती करून निवडणुकीत लढणार आहेत.
नाशिकमध्ये महायुतीने एकत्रित निवडणूक लढवावी असा प्रयत्न सुरू होता. परंतु भाजपा मित्रपक्ष शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला कमी जागा देत होते. त्यामुळे जागावाटपावरून या तिन्ही पक्षात एकमत झाले नाही. त्यामुळे आता शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्र निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २-३ दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. त्यामुळे अखेर महायुतीत फूट पडली असून भाजपा स्वबळावर लढणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

महायुती न करता भाजपा एकटी लढणार आहे. मात्र शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युतीत शिंदेसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार आहे. साधारण ९० जागा शिंदेसेना लढवणार आहे तर ३० जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहेत. अद्याप ८ ते १० जागांवर निर्णय बाकी असल्याने या जागावाटपात बदल होण्याची शक्यता असल्याचं बोलले जाते.  भाजपाकडून एकीकडे सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा विचार प्रबळ होत असतानाच रात्रीपर्यंत शिंदेसेनेसमवेत युतीच्या निर्णयाबाबत फारसे प्रयत्न झाले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर युतीत जागा कमी मिळण्याच्या शक्यतेने त्यातील शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ने रात्री उशिरापर्यंत भुजबळ फार्म हाऊसवर चर्चा केल्यावर ५९ टक्के जागा शिंदेसेना आणि ४१ टक्के जागा राष्ट्रवादी या फॉर्म्युलावर सहमती झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळले.
भाजपाकडून ८४/६/३२ अशा ऑफरची चर्चा
महायुतीतील बैठकांमध्ये भाजपा ८२राष्ट्रवादी अजित पवार ६तर शिंदेसेना ३४ असा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे समजते. परंतु त्यावर एकमत न झाल्याने सोमवारी या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार होता. महायुतीत लढल्यास शिंदेसेनेसह अजित पवार राष्ट्रवादी गटाची तडजोड करण्याची तयारी असल्याची चर्चा होती. अशा परिस्थितीत भाजपाचे नेते गिरीश महाजन रविवारी नाशिकला येऊन तिढा सोडवणार होते. मात्र मध्यरात्रीपर्यंत भुसे यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *