अमरावतीत जिल्हाध्यक्षांचा काँग्रेसला पाठिंबा
अमरावती : महिनाभर महाविकास आघाडीसोबत चर्चा करून अखेर स्वतंत्र लढण्याचा वंचित बहुजन विकास आघाडीच्या प्रकाश आंबडेकरांचा निर्णय त्याच्याच कार्यकर्तांना रुचलेला नाही. ठिकठीकाणी आंबेडकरांच्या पक्षात उठाव होत आहेत. आज अमरावतीत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षाविरोधात उठाव करीत काँग्रेसच्या उमेदवाराला पत्रकार परिषद घेऊन जाहिर पाठींबा दिला. वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पक्षादेश धुडकावत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गवई यांच्या या भुमिकेमुळे चर्चेत असणाऱ्या येथील भाजपाच्या उमेदवार नवनित राणा यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. भाजपाचे मित्रपक्ष असणाऱ्या बच्चू कडूं यांनी याआधीच राणांच्याविरोधात उमेदवार उभा केला आहे.
प्रकाश आंबेडकारांच्या स्वतंत्र लडण्याने भाजप विरोधातील मते विभागली जाणार असून त्याचा फायदा मोदींना होणार आहे अशी टिका विरोधकांकडून केली जात आहे. आज त्यात वंचितच्या कार्यकर्त्यांनी उठाव केल्यामुळे पक्षात आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
समाजाचा आणि कार्यकर्त्यांचा वाढता दबाव असल्याने पक्षाविरोधात निर्णय घेतला असल्याची माहिती शैलेश गवई यांनी दिली आहे. अमरावतीत वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांना पाठींबा जाहीर केला आहे. मात्र, रिपब्लिकन सेना वंचितच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांना मान-सन्मान देत नाही. असे असतांना त्यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्या प्रचारार्थ वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनाविरुद्ध काम करावे लागणार आहे. यामुळेच समाजाचा आणि कार्यकर्त्यांचा वाढता दबाव असल्याने पक्षाविरोधात निर्णय घेतला असल्याची माहिती शैलेश गवई यांनी दिली आहे.
आंबेडकर घराण्याची एकनिष्ठ
आम्ही जरी आज पक्षविरोधी निर्णय घेतला असला तरी आंबेडकर घराण्याशी आम्ही एकनिष्ठ आहोत आणि यापुढेही राहू. मात्र, अमरावती जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्ष हा वंचित पक्षातील कुठल्याही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अपेक्षेप्रमाणे मान-सन्मान देत नाही. प्रकाश आंबेडकर यांना अंधारात ठेवून हा पाठींब्याचा निर्णय घेतला गेलाय. या मतदारसंघातून भाजपाप्रणीत महायुतीचा उमेदवार निवडून येणे हे संविधान विरोधी आहे. त्यामुळे त्याला शह देण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे. असे न झाल्यास त्याचे सर्व खापर हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर फोडले जाणार आहे. त्यामुळे वंचितचा एक कार्यकर्ता आणि समाजातील एक सुजाण नागरिक म्हणून काँग्रेस उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहणे हे महत्त्वाचे असल्याचे वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई म्हणाले.
गवईसह पाचजण बडतर्फ
गवई यांच्या या भूमिकेमुळे वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी गवई यांच्यासह पाच जणांना पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे. गवई यांच्यासह अंजनगाव सुर्जीचे तालुकाध्यक्ष सुनील राक्षस्कर, महिला आघाडी शहाध्यक्ष भारती गुढधे, सचिव रेहना खान आणि महासचिव मेराज खान यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
