मुंबई : उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांच्या वाईल्ड लाईफ क्षेत्रातील कामगिरीची आंतरराष्ट्रीय मासिक फोर्ब्सने दखल घेतली आहे. तेजस ठाकरे यांच्या वाईल्ड लाईफ फाउंडेशनने पालीच्या नव्या दोन प्रजातींचा शोध लावला होता. ठाकरे फाऊंडेशनच्या या शोधाची दखल फोर्ब्स मासिकाकडून घेण्यात आली आहे. पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनने मिळवलेल्या यशाची जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने दखल घेतली आहे. गोल बुबुळे असलेल्या पालींचा शोध अत्यंत वैशिष्टयपूर्ण असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. तसेच ‘निमास्पिस व्हॅनगॉगी’ या प्रजातीच्या नामकरणाचेही विशेष कौतुक केले आहे.

पालीचे नाव ‘निमास्पिस व्हॅनगॉगी’

जगभरातून ‘नॅशनल जिओग्राफिक’, ‘हायपर ऍलर्जिक’, ‘मायामी हेराल्ड’ आदी माध्यमांकडून ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधनाची दखल घेतली गेली आहे. याच दरम्यान ‘पर्ज’ मासिकाने संशोधनाची वाहवा केली आहे. ज्यावेळी पाल सापडली त्यावेळी पालीचा रंग नावाजलेले चित्रकार वॅन गॉग यांच्या ‘द स्टारी नाईट’ या चित्राशी मिळताजुळता दिसला. त्यावरून पालीचे नाव ‘निमास्पिस व्हॅनगॉगी’ असे ठेवण्याची कल्पना तेजस ठाकरे यांना पहिल्यांदा सुचली होती. या नामकरणाचे विशेष कौतुक ‘फोर्ब्स’ मासिकाने केले आहे.

पालींच्या संशोधनावर देशविदेशातून अखंडितपणे कौतुकाचा वर्षाव

‘अत्यंत वैशिष्टयपूर्ण’ अशी दाद मिळालेल्या या संशोधनामध्ये तेजस ठाकरे यांच्यासह अक्षय खांडेकर आणि इशान अगरवाल यांनी सहभाग घेतला होता. नव्याने शोधलेल्या दोन्ही पालींचा समावेश निमास्पिस कुळात केला असून गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे. त्यामुळेच पालींच्या संशोधनावर देशविदेशातून अखंडितपणे कौतुकाचा वर्षाव सुरू राहिला आहे.

गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे वैशिष्ट्य

ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून सुरू असलेल्या हिंदुस्थानी द्वीपकल्पामधील पालींच्या सर्वेक्षणादरम्यान या पाली प्रथमतः आढळल्या. गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.  रंग, आकार, मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील ट्युबरकलची रचना आणि जनुकीय संचाच्या वेगळेपण यावरून दोन्ही पाली कुळातील इतरांपासून आणि एकमेकांपासून वेगळया ठरतात. नव्याने शोध लागलेल्या दोन्ही पाली दिनचर आहेत. छोटे किटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *