मुंबई : भारतीय क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षण, शिस्त आणि खेळाडू घडविण्याच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक उमेश गजानन मुरकर (कराटे व किक बॉक्सिंग) आणि मिलिंद रघुनाथ पूर्णपात्रे (बॅडमिंटन) यांना निहॉनसिकी कराटे अँड स्पोर्ट्स फेडरेशन यांच्या वतीने सन २०२५ चा ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
कराटे व किक बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांच्या विकासासाठी गेली २७ वर्षांहून अधिक काळ सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध व प्रेरणादायी कार्य करणारे उमेश गजानन मुरकर यांनी प्रशिक्षक, मार्गदर्शक व संघटक म्हणून असंख्य खेळाडू घडवले आहेत. ते शितो रियू स्पोर्ट्स कराटे व स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर या नामचीन संस्थेचे संस्थापक आणि गुरुकुल कृती फौंडेशन ट्रस्ट चे फॉऊंडर विश्वस्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून देशाचे नाव उज्वल केले आहे.
त्याचप्रमाणे, बॅडमिंटन या क्रीडा प्रकाराच्या प्रसारासाठी पन्नास वर्षां पेक्षा जास्त काळ निष्ठेने कार्य करणारे ज्येष्ठ प्रशिक्षक व खेळाडू मिलिंद रघुनाथ पूर्णपात्रे यांनी प्रशिक्षण, फिटनेस, शिस्त व स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालील खेळाडूंनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.त्यांनी स्वतः स्वीडन येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले असून गेली पन्नास वर्षे, सातत्याने एकेरी व दुहेरी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्याच प्रमाणे गेली 35 वर्षे शिवकालीन युद्ध कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे सुधीर गणपत कांबळे, यांना “खेळ रत्न पुरस्कार-2025” देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कारांच्या निमित्ताने आयोजित सन्मान व पुरस्कार वितरण समारंभ नुकताच शीतला देवी मंगलधाम, केळवे रोड, पालघर येथे संपन्न झाला.
या समारंभात निहॉनसिकी कराटे अँड स्पोर्ट्स फेडरेशनचे आशिया डायरेक्टर लक्ष्मीकांत पुंडलिक सारंग व विजया गोस्वामी, असिस्टंट पोलिस निरीक्षक यांच्या हस्ते दोन्ही मान्यवरांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, राकेश तिवरकर. Priyantha परेरा श्रीलंका, किरण कुंडपुरा कर्नाटक. प्रकाश सूर्यवंशी रिटायर CBI ऑफिसर , बहादूर बुरखा, नेपाळ, सागर दिवाळे, शंकर राम व अमोद सारंग हे सर्व ब्लॅक बेल्ट, अनेक प्रशिक्षक, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते तसेच पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे कुटुंबीय व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ हा क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रातील एक सर्वोच्च व मानाचा सन्मान मानला जातो. या पुरस्कारामुळे उमेश गजानन मुरकर आणि मिलिंद रघुनाथ पूर्णपात्रे यांच्यावर क्रीडा क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
