६वी अर्जुन मढवी स्मृती टी -२० महिला क्रिकेट स्पर्धा
मुंबई : छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना घसरगुंडी उडाल्यावर धनश्री वाघमारे आणि परिणीता पाटीलच्या आश्वासक फलंदाजीमुळे भारत क्रिकेट क्लबने माटुंगा जिमखान्यावर ५ फलंदाज राखून विजय मिळवत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित ६ व्या अर्जुन मढवी स्मृती टी -२० महिला क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. माटुंगा जिमखान्याने दिलेले १०६ धावांचे आव्हान भारत स्पोर्ट्स क्लबने ५ बाद १०७ धावा करत पूर्ण केले.
माटुंगा जिमखान्याच्या १०६ धावांचा पाठलाग करताना परिणीताने ३८ धावांची खेळी करत संघाला विजयाची आस दाखवली. पण आघाडीची फळी ढेपाळल्याने भारत क्रिकेट क्लबचा संघ अडचणीत आला. त्यावेळी धनश्रीने नाबाद १९ धावांची खेळी करत इतर फलदाजांच्या साथीने विजयाचे लक्ष्य गाठले. या डावात अलीना खानने दोन बळी मिळवले. त्याआधी कस्तुरी गोविलकरच्या नाबाद ४३ धावांच्या योगदानामुळे माटुंगा जिमखान्याने शतकी धावसंख्या उभारली. अलिना खानने संघाच्या धावसंख्येत २४ धावांची भर टाकली. निर्मिती राणेने तीन बळी मिळवत प्रतिस्पर्ध्यांनवर अंकुश ठेवला.
संक्षिप्त धावफलक : माटुंगा जिमखाना : २० षटकात ६ बाद १०६ ( कस्तुरी गोविलकर नाबाद ४३, अलिना खान २४, निर्मिती राणे ४-१६-३, प्रणाली कदम ४-१५-१, राजसी नागोसे ४-१७-१, परिणीता पाटील ४-२१-१) पराभूत विरुद्ध भारत क्रिकेट क्लब : १६.४ षटकात ५ बाद १०७ ( परिणीता पाटील ३८, धनश्री वाघमारे नाबाद १९, राजसी नागोसे नाबाद ६, अलिना खान ४-२३-२). भारत क्रिकेट क्लब ५ गडी राखून विजयी.
