आयडियलतर्फे १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा ४ जानेवारीला
मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड सहप्रायोजित ७ ते १४ वर्षामधील ६ वयोगटातील शालेय मुलामुलींची जलद बुध्दिबळ स्पर्धा ४ जानेवारी रोजी परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना, आयडियल ग्रुप व आरएमएमएस सहकार्यीत स्पर्धेमध्ये ७/८/१०/११/१३/१४ वर्षे वयोगटातील एकूण ९० विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कारासह गौरविण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली. दोन वयोगटात विजेत्या ठरणाऱ्या सबज्युनियर बुध्दिबळपटूस इंडियन ऑईल व आयडियल अकॅडमीतर्फे विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. स्विस लीग पध्दतीच्या किमान ४ फेऱ्यांमध्ये साखळी सामने होणार असून प्रत्येक साखळी फेरी १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे बुध्दिबळ पट व घड्याळ पुरविले जाणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (९३२४७ १९२९९) यांच्याकडे व्हॉटसअॅपवर १ जानेवारीपर्यंत संपर्क साधावा.
