डोंबिवली पूर्वेत पॅनल क्र. २९ मध्ये महायुतीला मोठा धक्का
शिंदे गटाचे माजी नगरसेवक रवी पाटील यांचा गंभीर आरोप
कल्याण : डोंबिवली पूर्वेतील पॅनल क्रमांक २९ मधील उमेदवारीवरून महायुतीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिंदे गटाचे माजी नगरसेवक व माजी उपजिल्हाप्रमुख रवी पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महायुतीतील भाजपचे अधिकृत उमेदवार मंदार टावरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रवी पाटील हे पॅनल क्रमांक २९ मधून इच्छुक उमेदवार होते. मात्र महायुतीकडून त्यांना उमेदवारी अर्ज न मिळता, ६५ अनधिकृत इमारती प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या “म्होरक्या” मंदार टावरे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप करून त्यांनी उघड बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल आहे. तरीही अशा व्यक्तीला भाजपाने उमेदवारी दिल्याचा आरोप रवी पाटील यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील आयरे गावात कार्यकर्ता मेळावा घेत रवी पाटील यांनी आपण पॅनल क्रमांक 29 मधून स्वतःचे स्वतंत्र पॅनल तयार करून चार अपक्ष उमेदवार उभे करणार असून, स्वतःही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची स्पष्ट भूमिका जाहीर केली. अनेक वर्षे महायुतीसाठी प्रामाणिकपणे काम केले, मात्र आता अशा लोकांना उमेदवारी दिली जात असल्याने अपक्ष लढण्याशिवाय पर्याय नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती आपण खासदार श्रीकांत शिंदे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून दिल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, महायुतीतील पॅनल क्रमांक २९ मधील ही बंडखोरी महायुतीसाठी किती महागात पडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
