राज्य मानांकन कॅरम स्पर्धा
मुंबई : कै किरण शेलार यांच्या स्मरणार्थ जयदत्त क्रीडा मंडळ आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत मुंबईच्या सिद्धांत वाडवलकरने माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या संजय मांडे याचा तीन सेटमध्ये चुरशीचा पराभव केला. संजय मांडे याने या स्पर्धेत प्रशांत मोरे व सागर वाघमारेसारख्या दिग्गज खेळाडूंवर विजय मिळवला होता. परंतु तो या स्पर्धेत विजयी ठरेल हि प्रेक्षकांची अपेक्षा साफ चुकीची ठरली. पहिला सेट सिद्धांतने २१-१६ असा जिंकून आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सेटमध्ये अनुभवाचा फायदा उठवत संजयने हा सेट २५-१९ असा जिंकला व सामान्य चुरस निर्माण केली. तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये पहिल्या सहा बोर्डापर्यंत सामना रंगतदार अवस्थेत चालला होता. मात्र सातवा बोर्ड सिद्धांतने सात गुणांचा घेत आघाडी घेतली. आणि आठव्या बोर्डनंतर २३-१३ अशा फरकाने सेट व सामना आपल्या खिशात घातला. संजय मांडेने अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी पुण्याच्या सागर वाघमारेला २-२५, १९-१७ व १९-१४ असे हरवले. तर मुंबईच्या सिद्धांत वाडवलकरने ठाण्याच्या झैद अहमदचा २५-१९, २५-० असा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत अतिशय चुरस झाली. तीन सेटपर्यंत रंगलेल्या या लढतीत पुण्याच्या सागरने ठाण्याच्या झैदवर २३-१२, १८-१९ व २५-२३ अशी मात केली.
महिला गटाच्या अंतिम सामन्यात आंतर राष्ट्रीय खेळाडू निलम घोडकेने विजय मिळवला. हा सामनाही अतिशय चुरशीचा झाला. सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणने पहिला सेट २४-७ असा सहज जिंकला होता. मात्र पुढील दोन सेट निलमने आक्रमक खेळाच्या जोरावर २५-११, २५-१३ असे जिंकून या गटाचे विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी निलमने मुंबईच्या अंबिका हरिथवर २१-१४, २३-१८ अशी मात केली. तर केशरने मुंबईच्या अंबिका हरिथला २५-११, १८-१७ असे नमवले होते. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात मुंबईच्या अंबिका हरिथने मुंबईच्या रिंकी कुमारीवर रंगतदार लढतीत २०-२५, २५-४ व २३-१८ अशी मात केली. जयदत्त क्रीडा मंडळ पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
