९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १ ते ४ जानेवारी दरम्यान सातारा येथे मराठी भाषेतील ज्येष्ठ लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून साहित्य रत्नांचे स्वागत करायला सातारा नगरी सज्ज झाली असून या संमेलनाची कार्यक्रम पत्रिकाही नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. तब्बल ३२ वर्षानंतर सातारा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. सातारा हे केवळ ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसौंदर्यासाठीच प्रसिद्ध नाही तर साहित्य आणि कला यांचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेले हे शहर मराठी साहित्याच्या या महाकुंभाचे आयोजन करण्यास सज्ज झाले आहे. राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले शिवेंद्रराजे भोसले हे या साहित्य संमेलनाचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार हे देखील या साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहे. हे साहित्य संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा व मावळा फाऊंडेशन यांच्या मार्फत आयोजित केले जात आहे. या साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने राजकीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांसोबत साहित्य रसिकही या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातील अनेक राज्यातून मराठी साहित्य रसिक या साहित्य संमेलनाला हजेरी लावेल असा विश्वास आयोजकांना आहे. साताऱ्यात होणारे हे साहित्य संमेलन मराठी साहित्य रसिकांना पर्वणीच ठरणार आहे. यावेळच्या साहित्य संमेलनाला मोठ्या प्रमाणात रसिक भेट देतील यात शंका नाही त्यामुळेच साताऱ्यात होणारे हे साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरेल यात शंका नाही. या साहित्य संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, चर्चा तसेच भरगच्च कार्यक्रम होणार आहे. संमेलनाचेअध्यक्ष विश्वास पाटील यांच्या भाषणाकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे तसेच अनेक ठराव करण्यात येणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असल्याने या साहित्य संमेलनाचे वेगळे महत्व आहे त्यामुळेच हे साहित्य संमेलन कोणत्याही वादाशिवाय पार पडेल अशी अपेक्षा साहित्य रसिक व्यक्त करीत आहेत. साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण गेल्या काही वर्षापासून बनले आहे. हे समीकरण यावेळी तरी बदलावे, या साहित्य संमेलनाला कोणत्याही वादाचे गालबोट लागू नये अशी अपेक्षा साहित्य रसिक व्यक्त करीत आहेत. अजून तरी या साहित्य संमेलनाविषयी कोणताही वाद उत्पन्न झाला नाही ही आनंदाची बाब आहे. असेच वादाविना साहित्य संमेलन पार पडावे. साहित्य संमेलन म्हणजे सारस्वतांचा मेळा वारकरी ज्या प्रमाणे पंढरपूरची वारी न चुकता करतात त्याप्रमाणे साहित्यिकही न चुकता संमेलनाला हजेरी लावतात. साहित्य रसिकही साहित्यिकांचे मत, विचार, चर्चा ऐकण्यासाठी आतुर असतात पण दरवेळी नको त्या विषयावर वाद होतो आणि त्या वादाच्या छायेतच साहित्य संमेलन पार पडते. त्यामुळे साहित्य संमेलनाचा मूळ उद्देशच भरकटतो. माध्यमात देखील त्या वादावरच चर्चा होते त्यामुळे साहित्य रसिकांचा मोहभंग होतो. त्यामुळे वादा शिवाय साहित्य संमेलन पार पडेल याची दक्षता आयोजकांनी घ्यावी. याशिवाय संमेलन आणखी लोकप्रिय होऊन तरुणाई या साहित्य संमेलनाकडे कशी आकर्षित होईल याचाही विचार आयोजकांनी करावा. आजचे तरुण सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करतात. तरुण वर्गाला साहित्य संमेलनामध्ये आकर्षित करायचे असेल आयोजकांनी साहित्य संमेलनाला समाज माध्यमांशी जोडावे. आयोजकांनी साहित्य संमेलनाचे सर्व अपडेट फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर या सारख्या समाज माध्यमांवर द्यावीत म्हणजे तरुणाईत देखील साहित्य संमेलन लोकप्रिय होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या साताऱ्यात होत असलेल्या हे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लोकप्रिय होऊन कोणत्याही वादाशिवाय पार पडेल ही अपेक्षा . ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मनापासून शुभेच्छा!

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *