मुंबई : सदानंद दाते महाराष्ट्राचे
नवे पोलिस महासंचालक असणार आहेत. राज्याचे नवे पोलिस महासंचालक पदावरील त्यांची नियुक्ती शासनाने अधिकृतपणे जाहीर केली आहे. ते १९९० च्या बॅचचे वरिष्ठ भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. दाते हे सध्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून पदभार स्विकारतील घेतील. रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ ३ जानेवारी २०२६ रोजी संपुष्टात येत आहे.
यापूर्वी सदानंद दाते यांनी केंद्रात एनआयए प्रमुख म्हणून काम पाहिले होते.
रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ संपत असल्याने शासनाने नवीन पोलिस प्रमुखाची प्रक्रिया सुरू केली. राज्य गृह विभागाने सात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या एम्पॅनेलमेंट समितीकडे सादर केली होती, ज्यापैकी सदानंद दाते यांची शिफारस करण्यात होती. शासकीय आदेशानूसार सदानंद दाते यांचा कार्यकाळ पदभार स्वीकारल्यापासून दोन वर्षांसाठी असेल.
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात कामा अँड अल्ब्लेस रुग्णालयात दहशतवादी अजमल कसाबचा थेट सामना करणारे धाडसी अधिकारी म्हणूनही दातेंची ओळख आहे. त्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते, परंतु कर्तव्य आणि धैर्याप्रती त्यांच्या समर्पणामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. त्यांना एक प्रामाणिक, निर्भय आणि व्यावसायिक पोलिस अधिकारी मानले जाते.
