अनिल ठाणेकर

ठाणे : मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो… मतदान हा संविधानाने दिलेला अधिकार असून या अधिकाराचे पालन प्रत्येकाने करुन येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होत असलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करा अशी जनजागृती स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून कळवा येथे करण्यात आली.

ठाणे महापालिकेच्या शाळा क्र. ६९, ७०, ११५ मध्ये स्वीप पथकाने मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थीदशेतच मुलांना मतदानाचे महत्व कळावे किंबहुना १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा हक्क प्राप्त होतो याबाबतचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मतदान करण्याबाबतची शपथ देण्यात आली. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या सूचनेनुसार स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी मिताली संचेती यांच्या मार्गदर्शनानुसार कळवा विभागात जनजागृती मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत शाळा क्र. ६९, ७०, ११५ चे सर्व विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव यांनी देखील मतदानाचे महत्व उपस्थितांना पटवून दिले.

चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती

कळवा येथील ठा.म.पा शाळा क्र. २९ मध्ये विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती केली. व्होट फॉर इंडिया असा संदेश देणारी चित्रे विद्यार्थ्यांनी साकारली. मतदान जनजागृती ‍विषयक जनजागृती करणारी चित्रे कल्पकतेने साकारली. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्याबाबतचे मार्गदर्शन स्वीपच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *