मुंबई : उध्दव ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगाला चँलेज दिले. हवे तर तुम्ही आमच्यावर कारवाई करा पण जय भवानी बोलणार म्हणजे बोलणारच असे ठाकरे यांनी निवडणूक आयोगाल ठणकावले.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मशाल गीतातील ‘जय भवानी’ शब्द काढण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या गीतातील भवानी शब्द काढणार नाही. जय भवानी, जय शिवाजी, ही आमची घोषणा आहे. घोषणेतील जय भवानी शब्द तुम्ही काढायला लावताय, उद्या तुम्ही जय शिवाजी काढायला लावाल, अशी हुकूमशाही पद्धत आम्ही स्वीकारणार नाही. आम्ही याच्या विरोधाच लढत आहोत, लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत आमच्या गीतातून जय भवानी शब्द काढला जाणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाने जर आमच्यावर कारवाई करण्याचं ठरवलं तर आधी मोदी आणि शाहांवर कारवाई करावी लागेल, मग ते आमच्या महाराष्ट्राच्या दैवतेचा अपमान कसं करतात, ते पाहू, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिलं आहे.
मध्य प्रदेश निवडणुकीच्या वेळेस बजरंग बली यांच्या नावावर मत द्या, असं वक्तव्य मोदी यांनी केलं होत. याशिवाय, आम्हाला मत दिल्यास रामल्लाचं मोफत दर्शन देऊ, असं अमित शाह जाहीर सभेत बोलले होते. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मोदी आणि शाहांचे ते व्हिडीओ दाखवले. मोदी आणि शाहांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितल्याचं ठाकरेंनी सांगितलं आहे.
निवडणुकीत धर्माच्या मुद्द्यावर प्रचार करणे, नियमांच्या विरुद्ध आहे. असं असताना मोदी आणि शाह हिंदुत्वाचा प्रचार करत असतील, तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही, अशी विचारणा उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावर निवडणूक आयोगाने उत्तर न दिल्यास नियम बदलला आहे, असं आम्ही समजू आणि आम्ही देखील असा प्रचार केला, तर तुम्हाला कारवाई करता येणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हा तुळजाभवानी मातेचा अपमान
तुळजाभवानी महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, ज्या तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना आर्शिवाद दिले. भवानी तलवारीचा प्रसंगही सर्वांच्या मनात कोरलेला आहे. ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात आहे. आम्ही गाण्यातील जय भवानी शब्द काढणार नाही. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या कुलदेवतेचा अपमान केल्याचा आरोप केल्यास निवडणूक आयोगाकडे याचं उत्तर आहे काय, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
जय भवानी…
60 सेकंदाचं प्रचारगीत
शंखनाद होऊ दे, रणदुदंभी वाजू दे
नादघोष गर्जू दे विशाल
दृष्टशक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या
धगधगती पेटू दे मशाल…
हे गीत एकूण 60 सेकंदाचं आहे. यामध्ये शेवटच्या काही सेकंदमधील फक्त 1 सेकंद जय भवानी असा उल्लेख गीतामध्ये करण्यात आला आहे. हाच 1 सेकंदावरुन निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना घेरलं आणि थेट नोटीस बजावली.
