ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन

साताराः भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या संजय दुधाणे लिखित चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त करण्यात आले. शाहू स्टेडियममधील साहित्य संमेलनाच्या प्रकाशन मंचावर संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते ऑलिम्पिकवीर खाशाबा पुस्तकाचे शानदार प्रकाशन झाले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, लेखक प्रा. संजय दुधाणे, मिलिंद जोशी, सुनीताराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

१९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत साताराचे सुपुत्र खाशाबा जाधव यांनी कुस्ती खेळात देशासाठी पहिले वैयक्तिक पदक जिंकले होते. त्याच्या ही ऐतिहासिक यशोगाथा २००० मध्ये क्रीडा लेखक संजय दुधाणे यांनी सर्वप्रथम लोकांसमोर आणली. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने हे पुस्तक केंद्र शासनाच्या नॅशनल बुक ट्रस्टनेही प्रकाशित केले होते. मराठीसह हिंदीमध्येही हे पुस्तक उपलब्ध आहे. पुस्तकाची रौप्यमहोत्सवी वाटचाल यंदा पूर्ण होत आहे.

८८ पानी चरित्र पुस्तक खाशाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांनी सजले आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने १५० रूपये किंमतीचे चरित्र १०० रुपयांत पुस्तक प्रदर्शनात उपलब्ध होणार आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा शाहू महाराज पुरस्काराने गौरवित झाले असून इयत्ता ९ वी नंतर आता इयत्ता ६ वीच्या पाठ्यपुस्तकातही या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे.

क्रीडालेखक संजय दुधाणे यांची आतापर्यंत २१ पुस्तक प्रकाशित झाली असून सातार्‍याचे ऑलिम्पिकपटू श्रीरंग जाधव यांचे चरित्र लेखनही दुधाणे यांनी केले आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव, संत सीतामाई, संत गणोरेबाबा, मेजर ध्यानचंद, भारतरत्न सचिन तेंडुलकर, फ्लाईंग शीख मिल्खासिंग, सुपर मॉम मेरी कोम, गोल्डन बॉय नीरज ही चरित्रे आणि आशियाई स्पर्धा, वाटचाल ऑलिम्पिकची, क्रीडापर्वणी, कथा ऑलिम्पिकच्या, ऑलिम्पिक अमृतानुभव, खेळांचा राजा-फुटबॉल, भारताचे ऑलिम्पिक, भारतीय खेळ, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी ही क्रीडाविषयक पुस्तके प्रसिध्द झाली आहेत. दुधाणे यांनी पॅरीस २०२४, टोकियो ऑलिम्पिक २०२१, रिओ ऑलिम्पिक २०१६, लंडन ऑलिम्पिक २०१२, आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच जागतिक हॉकी स्पर्धा, इंग्लडमधील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे थेट वृत्तांकन केले आहे. लंडन ऑलिम्पिक यशाचा षटकार अनुभवणारे एकमेव मराठी क्रीडापत्रकार आहेत.

फोटोओळ – खाशाबा जाधव चरित्राचे प्रकाशन करताना संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील , सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा क्रीडाधिकारी मा. नितीन तारळकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, लेखक प्रा. संजय दुधाणे, मिलिंद जोशी, सुनीताराजे भोसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *