पक्ष मेहेरबान, ‘घराणेशाही’ ठरली बलवान

हरिभाऊ लाखे

नाशिक : आमदार-खासदारांच्या कुटुंबीयांतील सदस्यांना उमेदवारी नाकारत ‘पार्टी विथ डिफरन्स’ दर्शवणाऱ्या भाजपने घराणेशाहीला मात्र बळ दिले आहे. आमदार-खासदारांच्या कुटुंबीयांतील सदस्यांना उमेदवारी नाकारत ‘पार्टी विथ डिफरन्स’ दर्शवणाऱ्या भाजपने घराणेशाहीला मात्र बळ दिले आहे. शिवसेना उबाठा गटातून भाजपमध्ये आलेल्या सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबात एक-दोन नव्हे, तर तब्बल चार एबी फॉर्म दिल्याने ते पत्नी आणि मुलासह मैदानात आहेत.

दुसरीकडे मनसेतून नुकतेच भाजपवासी झालेल्या दिनकर पाटील यांच्यावर मेहेरबानी दाखवत त्यांना व त्यांच्या मुलास उमेदवारी दिली आहे. राजकारणात घराणेशाहीबाबत कितीही दावे केले जात असले तरी, त्यास पर्याय नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

नाशिकमध्ये जवळपास सर्वच पक्षांनी घराणेशाहीस बळ मिळेल, असे तिकीटवाटप केले आहे. विशेषतः भाजपने केलेल्या तिकीटवाटपामुळे पक्षातील निष्ठावंतांना मोठा धक्का बसला आहे. सुधाकर बडगुजर यांना चार एबी फॉर्म दिल्याने, ते मुलगा दीपक बडगुजर व पत्नी हर्षा बडगुजर यांच्यासह निवडणुकीच्या मैदानात आहेत.

धक्कादायक म्हणजे प्रभाग क्रमांक २५ मध्ये तिघांच्या उमेदवारी निश्चित केल्यानंतर त्यांनी सिडकोतील प्रभाग २९ मध्येही मुलाची उमेदवारी ‘फिक्स’ केल्याने भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे प्रभाग २५ बरोबरच २९ मध्ये जोरदार लढत रंगण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मनसेतून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या दिनकर पाटील यांच्यावर देखील पक्षाची मेहेरबानी दिसून आली.

सातपूरमधील प्रभाग ९ मध्ये दिनकर पाटील व त्यांचे चिरंजीव अमोल पाटील यांना भाजपने उमेदवारी दिल्याने हे बाप-बेटे निवडणुकीच्या मैदानात आहेत. पाटील यांच्या घरात दोन तिकिटे दिल्याने या प्रभागातून भाजपच्या तिकिटावर इच्छुक असलेल्या प्रेम पाटील, सविता गायकर, गुलाब माळी, शकुंतला पवार यांनी बंडखोरी करत ऐनवेळी शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी मिळवली. त्यामुळे या प्रभागातदेखील मोठी रंगत निर्माण झाली आहे. चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

दीर-भावजय, काका-पुतण्या रिंगणात

भाजपने प्रभाग २४ मधून दीर-भावजय यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले आहे. कल्पना चुंभळे आणि कैलास चुंभळे यांना उमेदवारी दिल्याने येथेही घराणेशाहीची चर्चा रंगत आहे. घराणेशाहीला भाजपनेच केवळ बळ दिले नसून शिवसेना उबाठा गटातही हे पेव दिसून आले.

जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांच्यासह त्यांचा पुतण्या भूषण भामरे हा प्रभाग २८ मधून मैदानात आहे. एकीकडे निष्ठावंतांकडून उमेदवारीसाठी आक्रोश केला जात असताना दुसरीकडे पक्षांकडून घराणेशाहीला बळ दिले जात असल्याने एकच चर्चा रंगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *