राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या बियर शॉपवर कारवाई

दीव, दमणची अवैध दारू सापडली

परवाना रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना शिफारस

योगेश चांदेकर

पालघरः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर यांच्या बियर शॉपवर डहाणू उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असून चक्क बियर शॉपमध्येच दमण, बनावटीच मद्य  विकले जात असल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी या बियरशॉपचा परवाना रद्द करण्याची शिफारस उत्पादन शुल्क विभागाने केल्याचे समजते. जिल्हाधिकारी आता त्यावर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

पालघर जिल्ह्यात दीव, दमणची तसेच दादरा नगर हवेलीची दारू विकली जाते. ही दारू विकण्यासाठी पालघर जिल्ह्यात परवानगी नाही. असे असताना डहाणू तालुक्यातील वेतीवरोती बेलपाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर यांच्या बियर शॉपमध्ये ते विकले जात होते. अशोक भोईर हे वेतीवरोती येथील स्थानिक तंटामुक्त समितीचा अध्यक्ष आहे. वर्षअखेर तसेच नववर्षाच्या जल्लोषासाठी दीव, दमण वरून आलेल्या रॉयल स्टॅग, व्हीआयपी तसेच देशी दारूचे अन्य बॉक्स भोईर यांच्या बियरशॉपमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

मद्य विकायला परवानगी, पिण्यास नाही

वास्तविक या ठिकाणी फक्त मद्य विक्रीची परवानगी आहे. मद्य पिण्यासाठी परवानगी नाही असे असताना भोईर यांचायकडून तेथे एक रूम तयार करण्यात आली असून तेथे टेबल खुर्ची लावून लोक मद्यपान करत असतात. दरम्यान शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत बियर विक्री करणे बंधनकारक असतांना भोईर हे शासनाचे नियम धाब्यावर बसवून त्यांच्या मर्जीप्रमाणे  बियर शॉप सुरू ठेवत असल्याचे तेथील स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले

मंदिराशेजारी बियर शॉप

याशिवाय हे बियर शॉप बेलपाडा येथील हनुमान मंदिराच्या अगदीच शेजारी असून ते आता अशोक भोईर यांनी पत्नीच्या नावावर केले असले, तरी राजकीय दबावाखाली त्याच्यावर आतापर्यंत कारवाई करण्याचे टाळले जात होते; परंतु उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू येथील उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुनील देशमुख यांना या वाईन्समध्ये दीव, दमणची दारू अवैधपणे विकली जात असल्याचे समजल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली.

परवाना रद्द होणार?

उत्पादन शुल्क विभागाने आता या बियर शॉपीचा परवाना रद्द करण्यासंदर्भात वरिष्ठ विभागाला पाठवला असून  याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करतील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय भोईर यांचा बियर शॉप परवाना रद्द करणार असल्याचे समजते.

डहाणू उत्पादन शुल्कचा तडाखा

भोईर यांना डहाणू उत्पादन शुल्क विभागाने दिलेला हा मोठा तडाखा आहे. यापूर्वी कासा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भोईर यांच्या कारमध्ये दमण, दीवची अवैध दारू पकडली होती. त्यानंतर ही कार अनेक दिवस कासा पोलिस ठाण्यात लावून ठेवण्यात आली होती.  कासा पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाने केलेली ही कारवाई त्या वेळी चांगलीच चर्चेत होती.

बेकायदेशीर चकना!

बियर शॉपला फक्त  विक्रीचा परवाना असतो. तेथे बसून मद्य प्यायला परवानगी नसते; परंतु भोईर याच्यांसह अनेकांच्या बियर शॉपीमध्ये बेकायदेशीरपणे मद्य विकले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या बियर शॉपच्या शेजारी मद्य पिण्याची व्यवस्था केली जाते. शेजारीच गाड्या तसेच त्याबरोबर मद्याबरोबर लागणाऱ्या चकन्याची ही तेथे विक्री होत असते. या बेकायदेशीर आणि पिण्याच्या व्यवस्थेमुळे संबंधित विभागातील नागरिकांना त्याचा त्रास होतो. अनेकदा तिथे मारामाऱ्या होतात. हे प्रकार बंद करण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी आता थेट कारवाई करायला हवी.बियर शॉप साठीच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करायला हवी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *