डोळखांब प्रवासी निवारा शेडची दुरवस्था
ठाणे
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी शहापूर तालुक्यातील डोळखांब बाजारपेठेतील रस्त्यालगत उभारलेला सिमेंट पत्र्याचा छप्पर असलेले प्रवासी निवारा शेडची प्रचंड दुरावस्था झाली आहे. देखभाल दुरुस्ती अभावी ही शेडची दैन्यावस्था झाली आहे काही ठिकाणी हे शेड कोसळले आहे.शेडमध्ये तुटल्या – फुटल्या पत्र्याचे तुकडे पडले असून बसण्याच्या आसनाची दुरावस्था झाली असून शेडच्या खचलेल्या धोकादायक भिंती जीवघेण्या ठरू शकतात. निवारा शेडच्या मागील बाजूस असलेले गवत- झाडे-झुडपे आणि कचऱ्याचे ढिगारे प्रवाशांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. निवारा शेड अभावी प्रवासी,शालेय विद्यार्थी ,चाकरमानी ,नोकरदारवर्गाला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना ऊन, थंडी, वाऱ्यात रस्त्याच्या कडेला ताटकळत उभे राहून बसची वाट पहावी लागत असल्याने प्रवासी अपघाताची भीती व्यक्त करतात. प्रवाशांच्या सेवेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व परिवहन महामंडळाच्या बस व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर निवारा शेडची त्वरीत दुरुस्ती करावी.अशी मागणी स्थानिक प्रवाशांकडून होत आहे.
