सातारा : ‘महाराष्ट्रामध्ये सक्ती फक्त आणि फक्त मराठीचीच आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तमाम महाराष्ट्राला शब्द दिला. परदेशी भाषांना पायघड्या घालताना भारतीय भाषांना विरोध करण्याची वृत्ती योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.
‘मराठी भाषा वगळता अन्य कुठल्याही भाषेची सक्ती नाही. त्रिभाषा सूत्रानुसार आणखी कोणती भाषा समाविष्ट करावी याविषयी विचार सुरू आहे. कोणत्या वर्गापासून भाषा शिकवायची याचा विचार करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली असून या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. मराठी भाषा ही अभिजात होतीच. तिला राजमान्यता देण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने केले आहे. त्याचा उपयोग करून आता या भाषेला संपूर्ण भारतात लोकमान्यता मिळवून देण्याचे काम आपल्याला करायचे आहे.’
‘माय मराठीची अवहेलना होत असताना अन्य भाषांचे कोडकौतुक नको. भाषेला विरोध नाही परंतु सक्तीला विरोध आहे’, अशी भूमिका साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ‘महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच आहे’, असे स्पष्ट केले.

सध्या राजकारण्यांचा साहित्य संस्थांमधील हस्तक्षेप वाढला असून त्या संस्था ताब्यात घेण्याचा उद्योग सुरू आहे. साहित्यसंस्थांची स्वायत्तता जपली जावी, अशी अपेक्षा उदघाटन समारंभात व्यक्त झाली होती. त्या पार्श्वभूमीवर ‘साहित्यसंस्थांमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही’, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘साहित्यिकांनी राजकारणात जरुर यावे. परंतु साहित्यविश्वात त्यांनी राजकारण आणू नये’, अशी टिप्पणी त्यांनी केली.
चौकट

नवोदित लेखक स्वानुभवातूनच

घडतो – तारा भवाळकर
‘साहित्य क्षेत्रात येणाऱ्या नवीन कवी आणि लेखकांना संदेश देणे मला योग्य वाटत नाही. कारण, जो-तो आपल्या अवती-भोवतीच्या अनुभवातून अनेक गोष्टी शिकत असतो आणि त्यातूनच आपला मार्ग शोधत असतो,’ अशा मोजक्या पण अत्यंत अर्थपूर्ण शब्दांत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी नवोदितांना प्रोत्साहित केले. अनुभवांची ही शिदोरीच लेखकाला समृद्ध करते, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
त्या म्हणाल्या, ‘सातारा ही छत्रपतींची राजधानी असून दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रमुख केंद्र आहे. मी सांगलीत राहत असले, तरी सातारा आणि सांगली ही दोन शहरे माझ्यासाठी अंगण-वस्तीसारखी आहेत. या ऐतिहासिक भूमीत साहित्य संमेलन होत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे सांगत साताऱ्याच्या साहित्य पर्वाला डॉ. भवाळकर यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *