श्याम तारे
हे छायाचित्र बनवलेले आहे असे तुम्हाला वाटले असेल परंतु ही छायाचित्र अगदी खरे आहे आणि एका रुग्णावर अशी शस्त्रक्रिया करावी लागण्याचा प्रसंग घडला आहे. ही अतिशय महत्वाची शस्त्रक्रिया चीनमध्ये केली गेली असून रुग्ण आता घरी जाणार आहे. तर त्याचे असे झाले की कारखान्यात प्रचंड आकाराच्या यंत्रावर काम करणाऱ्या महिलेचा एक विचित्र अपघात झाला. या अपघातात तिच्या डोक्यावरील त्वचेचा कानासाहित एक मोठा भाग तुटून वेगळा झालेला दिसत होता. तेथील सूक्ष्म शस्त्रक्रिया विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किऊ शेंकियांग म्हणाले की तिची ही त्वचा आणि त्यासोबत कापला गेलेला तिचा कान त्यावर ताबडतोब शस्त्रक्रिया करून जोडणे शक्य नव्हते. त्यामुळे महिलेचा जीव वाचवण्यासाठी आणि ती काहीशी बरी होईपर्यंत तिचा हा कान जपून ठेवण्याचा आणि नंतर तो वेगळ्या शस्त्रक्रियेने जोडण्याचा निर्णय घेतला गेला.
डोक्याला असलेली त्वचा आणि चेहरा बराचसा फाटला होता आणि कान तर तुटून बाहेर चिकटला होता. अशी शस्त्रक्रिया ताबडतोब करणे शक्यच नव्हते कारण आजवर जगातही असा प्रसंगच आला नव्हता. वैद्यकीय शक्यतेच्या बाहेरचीच ही बाब होती. कारण डोक्याची त्वचा पूर्ववत व्हायला किमान काही महिने लागणार होते. प्रत्यक्ष अडचण अशी होती की शरीराचा असा कोणताही भाग केवळ बर्फामध्ये ठेवून उपयोग नव्हता. त्यावर उपाय म्हणून डॉक्टरांच्या पथकांने कानाचा हा भाग महिलेच्याच शरीरातील इतर एखाद्या भागावर रोपण करण्याचा विचार केला आणि यासाठी पायाची निवडही विचारपूर्वक केली गेली. याचे वैद्यकीय कारण असे होते की मानवी शरीरातील पायाच्या धमन्या आणि रक्तवाहिन्या कानाजवळच्या भागासारख्याच असतात. आणि पायामधील पेशी आणि त्वचा देखील डोक्याच्या त्वचेसारखीच पातळ असते.
डॉक्टर चमूचा हा निर्णय पुस्तकी सिद्धांत ज्ञानाच्या दृष्टीने योग्य वाटत असला तरी यात एक मोठी जोखीम होती. एखादा भाग जपून ठेवण्यासाठी शरीराच्या दुसऱ्या भागाला जोडणे याला ‘हीटरोटॉपिक’ रोपण असे नाव आहे. बऱ्याच प्रत्यारोपणामध्ये याचा उपयोग केला जातो. परंतु पाय आणि कान असा याचा उपयोग आजवर कुणीही विचारात देखील घेतला नसावा.
असा प्रयोग करायचे ठरवले गेले आणि डॉक्टरांच्या चमूने केलेली अतिशय नाजूक अशा रक्तवाहिन्यांसह हा कान पायावर रोपण करण्याची दहा तासांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. पण इतक्या किचकट प्रक्रियेत गुंतागुंत होण्याची शक्यताही लवकरच दिसली. कानाच्या रक्तवाहिन्यांची रक्त हृदयाकडे परत पाठवण्याची धडपड सुरु होती पण ते आवश्यक तेवढे शक्य होत नसल्याने रक्त साकळत होते. हीई गुंतागुंत दुरुस्त करायला आणखी पाच दिवसांचे अथक परिश्रम आणि किमान पाचशे प्रयत्न करावे लागले आणि त्यानंतर कान एकदाचा पायावर स्थिर झाला. .
कान अशा रीतीने स्थिर झाल्यानंतर डॉक्टरांनी महिलेचा डोक्याचा आणि मानेचा भाग दुरुस्त केला आहे. अपघात झाल्यानंतर जवळ जवळ पाच महिन्यांनी या महिलेचा कान आता पायावरून पुन्हा एकदा आपल्या जागेवर बसवला गेला आहे. वैद्यकीय क्षेत्रातली ही क्रांतिकारक घटनाच मानावी लागेल असे तुम्हालाही वाटत असेलच…
प्रसन्न फीचर्स
