मुंबईत शिंदेच्या शिवसेनेची मतदार राजालाच मारहाण !
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दहिसर (पश्चिम) वॉर्ड क्रमांक १ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवाराच्या निकटवर्तीयांनी एका मतदाराला व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी दहा पेक्षा अधिक आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कांदरपाडा येथील मीठाघर परिसरात शिंदे सेनेचे कार्यकर्ते प्रचारासाठी दाखल झाले. तक्रारदार विजय लक्ष्मण पाटील यांचा आरोप आहे की, हे लोक कोणतीही परवानगी न घेता थेट त्यांच्या घरात घुसले.
विजय पाटील यांनी घरात महिला असल्याने किमान शिष्टाचार म्हणून दार ठोठावण्याची विनंती केली. मात्र, याच क्षणी कार्यकर्ते संतप्त झाले आणि पुढच्याच क्षणी हिंसाचाराला सुरुवात झाली.
आरोपींनी विजय पाटील यांना जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी आणि लाकडी बांबूंनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या पत्नीला आणि भाऊ प्रशांत यांनाही ओढत बाहेर काढून मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात शिंदे सेनेच्या उमेदवार रेखा राम यादव यांच्या निकटवर्तीयांचा— दिर दिनानाथ यादव, त्यांचे सहकारी आणि अन्य कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. शिवीगाळ आणि धमक्यांमुळे परिसर हादरून गेला.
