वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिरातर्फे प्लास्टिक मुक्तीचा संकल्प

‘स्वच्छता अभियान’ उत्साहात संपन्न !

मुकुंद रांजाणे (माथेरान)

निसर्गरम्य माथेरानच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या प्लास्टिक प्रदूषणाविरोधात वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर, माथेरान येथील विद्यार्थ्यांनी कंबर कसली आहे. कार्यतत्पर मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापक  दिलीप अहिरे यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या वतीने नुकतेच परिसरात ‘स्वच्छता अभियान’ आणि ‘प्लास्टिक मुक्ती’ उपक्रम अत्यंत उत्साहात राबविण्यात आला.

या मोहिमे अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी परिसरात साचलेला प्लास्टिक कचरा एकत्रित केला. विद्यार्थ्यांनी केवळ स्वच्छताच केली नाही, तर प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत परिसरातील नागरिक आणि पर्यटकांमध्ये जनजागृतीही केली. यावेळी गोळा करण्यात आलेल्या प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेच्या स्वच्छता विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

या उपक्रमाबाबत बोलताना शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी सांगितले की, “माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे. भावी पिढीमध्ये पर्यावरणाप्रति जाणीव निर्माण व्हावी आणि आपले शहर प्लास्टिकमुक्त व्हावे, या उद्देशाने आम्ही हे स्वच्छता अभियान राबवले आहे.”प्लास्टिक मुक्ती आणि पर्यावरणाचे रक्षण हाच एकमेव उद्देश ठेऊन शाळेच्या

विद्यार्थ्यांनी स्वतः कचरा गोळा करून स्वच्छतेचा धडा दिला.

या मोहिमेत शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. चिमुकल्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे माथेरानमधील नागरिकांकडून आणि पालकांकडून मोठे कौतुक होत आहे. ‘स्वच्छ माथेरान, प्लास्टिकमुक्त माथेरान’ असा संदेश देत या अभियानाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *