शाहू शिक्षण संस्था आदर्श संस्था पुरस्काराने सन्मानित
कल्याण : शहाड येथील शाहू शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री वेलबाई देवजी हरिया कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, अध्यापक महाविद्यालय, देवजी भाई हरिया विधी ही महाविद्यालये ज्ञानदानाचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. संस्थेने नुकताच नॅक मानांकने मिळवित आपली योग्यता सिद्ध केली आहे. संस्थेच्या याच कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने कोकण विभागातून यंदाचा आदर्श शिक्षण संस्था हा पुरस्कार भव्यदिव्य सोहळ्यात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याहस्ते शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गिरीश कटके यांच्याकडे हा सन्मान नुकताच सुपूर्द करण्यात आला.
पारंपारिक शिक्षणाबरोबरच काळसुसंगत अशी आदर्श विचारसरणी विद्यार्थी मनात रुजवण्याच्या कार्यात या संस्थेने शहाड, आंबिवली, उल्हासनगर, कल्याण या शहरात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. २००४ सालापासून शाहू शिक्षण संस्था कल्याण शहरात थोर समाजसेवक डॉ. गिरीश लटके यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली शिक्षणाचे कार्य करीत आहे. “शाहू शिक्षण संस्थेचा झालेला हा सन्मान माझा एकट्याचा नसून तो महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाहू शिक्षण संस्थेचे प्रशासक तसेच अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष यांचा हा सन्मान आहे” असे डॉ. गिरीश लटके यांनी सत्कार प्रसंगी काढले.
