महिला लीग क्रिकेट स्पर्धा

निर्मिती,किमया, धनश्री चमकल्या

मुंबई : निर्मिती वाळंजू, किमया राणे आणि धनश्री वाघमारेच्या उपयुक्त फलंदाजीमुळे भारत क्रिकेट क्लबने एमआयजी क्रिकेट क्लबचा पाच फलंदाज राखून पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या महिला लीग क्रिकेट स्पर्धेत विजयाची नोंद केली. एमआयजी क्रिकेट क्लबला ९८ धावांमध्ये गुंडाळत भारत क्रिकेट क्लबने २७.२ षटकात ५ बाद १०२ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

सुरुवातीला अचूक गोलंदाजी करत निर्मिती राणे आणि कशिश निर्मळने एमआयजी क्रिकेट क्लबला शतकी धावसंख्या पार करुन दिली नाही. निर्मिती आणि कशिशने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. रिया दोशीच्या २३ आणि पलक धारमशीच्या नाबाद १५ धावांमुळे एमआयजीला एवढी मजल मारता आली.

उत्तरादाखल सलामीला आलेल्या निर्मिती वाळंजू आणि किमया राणेने संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण किमया बाद झाल्यानंतर भारतचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. अशावेळी धनश्री वाघमारेने चिवट फलंदाजी करत संघाला विजयाच्या समीप नेले.  निर्मितीने नाबाद ४६, किमया आणि धनश्रीने प्रत्येकी २१ धावा केल्या. पराभूत संघाच्या यशिका रावतने तीन आणि दिक्षा पवारने दोन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक : एममायजी क्रिकेट क्लब: २४ षटकात सर्वबाद ९८ ( रिया दोशी २३, पलक धरमशी नाबाद १५, निर्मिती राणे ६-१-१६-२, कशीश निर्मळ ६-२-५-२) पराभूत विरुद्ध भारत क्रिकेट क्लब : २७.२ षटकात ५ बाद १०२ ( निर्मिती वाळंजू नाबाद ४६, किमया राणे २१, धनश्री वाघमारे २१, दिक्षा पवार ८-१-१४-२, यशिका रावत ६-२७-३).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *