बचावाच्या तंत्रात सुधारणा करा – वेंगसरकर
मुंबई : ‘दीर्घ काळाच्या फॉरमॅट मध्ये आपल्या खेळाडूंनी यशस्वी व्हावे असे वाटत असेल तर प्रशिक्षकांनी त्यांच्या बचावाच्या तंत्रात सुधारणा करणे गरजेचे आहे, जेव्हा विकेटवर चेंडू वळायला लागतो त्यावेळी काय करायचे हे न कळल्याने आणि फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी आवश्यक ते पदलालित्य नसल्याने फलंदाज आक्रमण करण्यावर भर देतात. आक्रमण करणे सोपे असते; पण खरोखरच फिरकी गोलंदाजीविरुद्ध यशस्वी व्हायचे असेल तर तुमचा बचाव भक्कम हवा” असे भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय निवडसमितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी म्हटले आहे. ओव्हल मैदान,चर्चगेट येथील आपल्या अकादमीच्या मैदानावर झालेल्या १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या १४ वर्षाखालील मुलांच्या निवड समितीचे चेअरमन श्रीधर मांडले आणि मुंबई महानगर पालिकेच्या गार्डन डिपार्टमेंटचे सुपरिंटेंडेंट जितेंद्र परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी श्री माँ विद्यालय संघाने ब्रावो क्रिकेट अकादमीवर ६ विकेट्सनी मात करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ब्रावो क्रिकेट अकादमी संघाला ४० षटकांच्या या सामन्यात केवळ ३५ षटके टिकाव धरता आला आणि त्यांचा डाव १२७ धावांत गुंडाळला गेला. धियान बराई (२९) आणि भावयम (३५) यांनी ५० धावांची सलामी दिल्यानंतर शौर्य काटे (नाबाद ३१) आणि देवांश दळवी (११) यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी साफ निराशा केली. प्रतिस्पर्धी संघाच्या युवान जैन याने टिच्चून गोलंदाजी करताना १८ धावांत ३ बळी मिळविले. या आव्हानाचा पाठलाग करताना श्री माँ विद्यालय संघ देखील ३ बाद १९ असा सुरुवातीला अडखळत होता, मात्र आरव सिंग याने विवान मांजरेकर (१४) याच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी आणि नांतर कनिष्क साळुंखे (नाबाद २८) याच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ४२ धावांची अभेद्य भागीदारी रचून आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. दरम्यान आरव सिंगने केवळ ४८ चेंडूत नाबाद ५३ धावांची खेळी करताना १० चौकार मारले. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज आणि सर्वोत्तम खेळाडू (स्पर्धेत १९१ धावा) म्हणून देखील त्यालाच गौरविण्यात आले. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून देवांश दळवी (९ बळी) तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून दर्श मातले (दोघेही ब्रावो क्रिकेट अकादमीचे) यांची निवड करण्यात आली. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मुंबईच्या १४ वर्षाखालील मुलांच्या निवड समितीचे चेअरमन श्रीधर मांडले आणि मुंबई महानगर पालिकेच्या गार्डन डिपार्टमेंटचे सुपरिंटेंडेंट जितेंद्र परदेशी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक – ब्रावो क्रिकेट अकादमी – ३५ षटकांत सर्वबाद १२७ (धियान बराई २९, भावयम ३५, शौर्य काटे नाबाद ३१; युवान जैन १८ धावांत ३ बळी) पराभूत वि. श्री माँ विद्यालय – २४.२ षटकांत ४ बाद १२९ (आरव सिंग नाबाद ५३, कनिष्क साळुंखे नाबाद २८) सामनावीर – आरव सिंग.
