एमआयडीसी निवासीतील नागरिक मतदानावर टाकणार बहिष्कार
पावसाळी गटारात शौचालयाचे मलमूत्र आल्याने नागरिक दुर्गंधीने त्रस्त
कल्याण: डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील नागरिक हे वेगवेगळ्या समस्येने त्रस्त झाले आहेत. त्यात एक वेगळी अशी भयानक दुहेरी वासाची समस्या एकत्र त्यांच्यापुढे गेल्या दोन महिन्यापासून सुरु झाल्याने ते हैराण झाले आहेत. पावसाळी गटारात शौचालयाचे मलमूत्र आल्याने नागरिक दुर्गंधीने त्रस्त असून या त्रस्त नागरिकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.
एमआयडीसी निवासी मधील चार बिल्डिंग नावाने असलेला भाग हा अगदी रासायनिक कारखान्यांना लागून म्हणजे एमआयडीसी फेज दोन जवळ असलेला परिसर आहे. या भागातील पावसाळी गटारात गेल्या दोन महिन्यापासून शौचालयाचे मलमूत्र हे गटारात आल्याने त्याचा तीव्र असा घाण वास येत आहे. विशेष म्हणजे येथील रहिवाशांनी ही बाब येथील सर्व राजकीय पक्षांचा पदाधिकाऱ्यांना सांगून झाली आहे तसेच केडीएमसी, एमआयडीसी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. एमआयडीसी आणि केडीएमसी अधिकारी याची पाहणी पण करून गेले पण कोणीही यावर कार्यवाही केली नाही.
या शौचालयाचा मलमूत्र दुर्गंधी बरोबर येथील लागून असलेल्या रासायनिक कंपन्यांचे विषारी वायू प्रदूषणाचा त्रास हा पण अधूनमधून येत असल्याने येथील रहिवाशी या दुहेरी वास येण्याचा समस्येने हैराण झाले आहेत. या चार बिल्डिंग म्हणजे ‘ओम सदिच्छा’, ‘ओमकार छाया’, ‘माणिकरत्न’, ‘गौरी नंदन’ अशा चार गृहनिर्माण वसाहती असून त्यात ४८ कुटुंब राहत असून अंदाजे दोनशे मतदार आहेत. त्या सर्वांचे म्हणणे आहे की शौचालय दुर्गंधी आणि रासायनिक प्रदूषण ही समस्या जोवर सुटत नाही तोपर्यंत आम्ही येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली.
दरम्यान हा प्रभाग क्रमांक १९ पॅनल मध्ये येत असून त्यातील अ, ब, क हे तीन वार्ड बिनविरोध झाले असून फक्त ड मधील जागेसाठी बीजेपी व मनसे यांच्यात सामना होणार आहे.
