आपले सरकार पोर्टलवरील २ हजार ८४० तक्रारी निकाली
अनिल ठाणेकर
ठाणे : राज्य सरकारने सुरु केलेल्या आपले सरकार २.० वरील तक्रारी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणे सामान्य प्रशासन विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेस आपले सरकार पोर्टलवर २ हजार ८९५ तक्रारी प्राप्त झाल्या असून २ हजार ८४० तक्रारी निकाली काढल्या आहे तर फक्त ३८ तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी क्षेत्रीय स्तरावर विस्तृत अहवाल मागणीसाठी प्रलंबित आहेत. या पोर्टलद्वारे ग्रामस्थांना आपल्या तक्रारी ऑनलाइन दाखल करणे तसेच त्याची सद्यस्थिती जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध असून ९८ टक्के तक्रारी निकाली काढण्यात यश मिळवले आहे.
शासन निर्देशानुसार २१ दिवसांच्या आत तक्रारीचे निराकरण करणे अनिवार्य असून मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या तक्रारी सरासरी २१ दिवसांच्या आतच निकाली काढण्यात येत असून सर्व विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी यासाठी विषेश प्रयत्न केले आपले सरकार पोर्टलवरील प्राप्त तक्रारींचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक सोमवारी साप्ताहिक सखोल आढावा घेण्यात येतो. तक्रारदाराची तक्रार मांडणी व्यवस्थित न झाल्यास किंवा म्हणणे न समजल्यास तक्रारदारास दूरध्वनीवर तात्काळ संपर्क केला जातो. तक्रारींचे निवारण ठाणे जिल्हा परिषदेकडून उत्तमप्रकारे होत असल्याबाबत १०७२ तक्रारदार यांनी आपले अभिप्राय नोंदवले असून त्यापैकी १०६८ तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी दिली. राज्य शासनाच्या १५० दिवस कार्यक्रम या अभियान अंतर्गत आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी निकाली काढण्यासाठी देखील विषेश भर देण्यात येत आहे.
