एमआयडीसी निवासीत आरोग्याचा प्रश्न गंभीर
नाला कचरा, प्लास्टिकने भरला त्यात सांडपाणी वाहिनी फुटली
कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये एक नाही अनेक प्रश्न गंभीर स्वरूपात उभे टाकले आहेत. जागनाथ सुपर मार्केट समोर मुख्य रस्त्याचा कडेला असलेल्या नाल्यात कचऱ्याचा आणि प्लास्टिकचा थर जमा झाला असून त्यातून कसल्यातरी पाण्याचा बुडबुडा, फवारा येऊन त्यात मिसळत असल्याचे दिसत आहे. ही बाब गेल्या कित्तेक दिवसांपासून सुरु असून या रस्त्यावरून रोजच प्रशासनाचे अधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते जात असतात. या नाल्याची साफसफाई करून त्यातून येणारा पाण्याचा फवारा हा कसला आहे हे शोधून पाहण्याची कोणालाच आवश्यकता भासत नाही.
याच नाल्याचा कडेला अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान बसाविले असून त्यांचा कचरा पण याच नाल्यात पडत असावा. याच फेरीवाल्यांचे कोणीतरी आधारस्तंभ असावेत त्यामुळे त्यांनाही हटविले जात नाही. आता सर्व लोकही उदासीन झाले असल्याचे दिसत असून आपले काम भले बाकी काही होवो. अशी जनतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. एमआयडीसी आणि केडीएमसी प्रशासन हे एकमेकांकडे बोट दाखवून फक्त नोटीस देण्यापलीकडे काहीही करीत नाही. महापालिकेच्या निवडणुकीनंतर लोकनियुक्त प्रशासन येऊन काही सुधारणा होतात की नाही ते पाहावे लागेल.
