मतदानविषयक माहितीसाठी माहिती पत्रकांचे वितरण आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती

अशोक गायकवाड

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक यंदा पहिल्यांदाच बहुसदस्यीय पध्दतीने होत असून महानगरपालिका क्षेत्रात २८ प्रभागांपैकी १ ते २७ क्रमांकाचे प्रभागांमध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशा ४ जागांसाठी मतदान करावयाचे आहे. तसेच २८ क्रमांकाच्या प्रभागात ‘अ’, ‘ब’, ‘क’ अशा ३ सदस्यांना मतदान करावयाचे आहे. या करिता मतदान यंत्रावर प्रत्येक जागेसाठी एकाखाली एक वेगळ्या रंगाची मतपत्रिका असणार असून नागरिकांनी प्रत्येक जागेसाठी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला एक मत द्यायचे आहे. या बहुसदस्यीय पॅनल पध्दतीत मतदान कसे करावे याची माहिती मतदारांना सहजपणे उपलब्ध व्हावी या करिता सध्याच्या सोशल मिडीयाप्रेमी युगात या विषयी बनविलेल्या व्हिडीओ चित्रफितीचे प्रसारण फेसबूक, इंस्टाग्राम, एक्स, यू ट्युब तसेच व्हॉट्सअप अशा विविध माध्यमांतून करण्यात आले असून या चित्रफितीव्दारे मतदानाची प्रक्रिया सहजपणे कळते असे अभिप्राय नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. याशिवाय शहरामध्ये वर्दळीच्या भागात बॅनर्सव्दारे तसेच डिजिटल होर्डिंग वरुन पॅनल पध्दतीतील मतदानाची प्रक्रिया सोप्या पध्दतीने प्रदर्शित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या पध्दतीची माहिती देणारी पॅम्प्लेट स्वरुपातील माहिती पत्रके तयार करण्यात आली असून त्याचे वितरण शहरातील सर्व भागात करण्यात येत आहे. नवी मुंबईकर नागरिक पहिल्यांदाच बहुसदस्यीय पॅनलपध्दतीने होणा-या महानगरपालिका निवडणूकीमध्ये मतदान करणार असल्याने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमांतून बहुसदस्यीय पध्दतीत मतदान कसे करावे याविषयी जनजागृती करण्यात येत आहे तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ मोहीमेंतर्गत विविध उपक्रमातून लोकांपर्यंत मतदानाचा हक्क बजवावा हा संदेश व्यापक स्वरुपात पोहचविला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *