यापुढे मोटार वाहन निरीक्षकांच्या समक्ष होणार रिक्षा स्क्रॅप
कल्याण : रिक्षा स्क्रॅप करण्यासाठी एमएमआरटीए प्राधिकरणाने कार्यपद्धती निश्चित केलेली आहे. असे असतानाही यामध्ये अनेक ठिकाणी गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने कल्याण आरटीओने परिपत्रक जारी केले आहे. यापुढे मोटार वाहन निरीक्षकांच्या समक्ष आरटीओ कार्यालयामध्ये रिक्षा स्क्रॅप करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे कल्याणचे उपप्रादेशिक अधिकारी आशुतोष बारकुल यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने २०१५ च्या ठरावानुसार ऑटो रिक्षा मोडीत काढण्यासाठी स्पष्ट तरतुदी केल्या आहेत, मात्र त्याचे उल्लंघन करून उल्हासनगर परिसरात रिक्षा स्क्रॅप केल्या जात असल्याचे निदर्शनास आले. रिक्षा स्क्रॅप करण्यामधील गैरप्रकार रोखण्यासाठी कल्याणचे उपप्रादेशिक अधिकारी आशुतोष बारकुल यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये सर्वप्रथम परवानाधारकाने विहित मुदतीत व नमुन्यात अर्ज सादर करावा, सीएनजी बाटला काढावा, कार्यालयीन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांच्याकडून रिक्षा स्क्रॅपसाठी तपासणी करावी, त्यांच्या समक्ष स्क्रॅप काढण्याची कार्यवाही आरटीओ कार्यालयाच्या आवारात करावी, स्क्रॅप वाहनासोबतचे त्यांचे फोटो, नाव, पदनाम स्वाक्षरीसह कार्यालयात सादर करावे, रिक्षा मालकाने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या समक्ष हजर राहून अंतिम आदेश प्राप्त करून घ्यावेत.
भंगार विक्रेत्याने त्याच्याकडील वजनकाटा हा वजन-मापे कार्यालयाकडून प्रमाणित केलेला असावा, त्यावर वजन करून पुढील कार्यवाही करावी तसेच वाहन स्क्रॅप केल्यानंतर त्याच्या भंगाराची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी वाहन मालकाने स्वतः करावी असे नमूद केले आहे. मोटार वाहन निरीक्षकाने वाहन स्क्रैपबाबतची नोंद वाहन ४.० संगणक प्रणालीवर घ्यावी, अशा स्पष्ट सूचनाही बारकुल यांनी या परिपत्रकात दिल्या आहेत.
