मेट्रो आणि पाण्याच्या विलंबाचे पाप नरेंद्र मेहताचेच- प्रताप सरनाईक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ११ तारखेला भव्य नागरी सत्कार
अरविंद जोशी
मिरा – भाईंदर: मिरा – भाईंदरकारांना मिळणारं पाणी तसेच येणारी मेट्रो याला सेव्हन इलेव्हन या नरेंद्र मेहता यांच्या कंपनीने केलेल्या आडकाठीमुळे विलंब झाला असा आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. यावेळी त्यांनी केलेला पत्रव्यवहार तसेच त्याला महापालिकेकडून मिळालेली उत्तरे पत्रकारासमोर मांडत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ११ जानेवारी २०२६ रोजी मिरा – भाईंदरमध्ये येणार आहेत, त्यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रताप सरनाईक बोलत होते. उपमुख्यमंत्र्यांचा भव्य नागरी सत्कार करण्याचे तसेच त्यांना ताम्रपत्र द्यायचे त्यांनी ठरवले असून गेल्या साडे तीन वर्षात झालेला मिरा-भाईंदरचा विकास हा त्यांच्यामुळे झाल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या २७०० करोड एवढ्या निधीमुळे शहराचा विकास झाला, गाईला गोमातेचा दर्जा मिळाला, तसेच एका मोठ्या गोशाळेची घोषणा ११ तारखेच्या सभेत करण्यात येईल असं ते पुढे म्हणाले. मेट्रो स्थानकाचे होणारे काम सेवन इलेव्हन या कंपनीने बंद पाडलं त्यामुळे मेट्रोला विलंब झाला, तसेच चेन्ना गावाकडील पाईप लाईनचे कामसूद्धा या कंपनीने बंद पाडले त्यामुळे शहराला मिळण्याऱ्या पाण्याला विलंब होतं आहे हे सरनाईकांनी केलेल्या पत्रव्यवहारातून पुराव्यानिशी दाखवून दिले. यासंदर्भातले सगळे पुरावे आणि पत्र ते मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांची सभा आज मिरा – भाईंदरमध्ये ठरली आहे. ते मुख्यमंत्री तसेच विधिमंडळाचे नेते असल्याने त्यांच्या स्वागतासाठी बोर्ड लावणार असल्याचे सांगितले.
आमदार नरेंद्र मेहता यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांवर बोलताना सरनाईक म्हणाले की त्यांनी पुरावे द्यावेत, चौकशी लावावी मी सगळ्यासाठी तयार आहे. दोघांच्या या आरोपांच्या खेळात जनता कोणाला धडा शिकवणार हे १६ तारखेला कळेलच, आपण वाट पाहूया.
