घाटकोपर जॉली जिमखाना कॅरम स्पर्धा

प्रशांत – समृद्धीला प्रथम मानांकन

मुंबई : विद्याविहार ( पश्चिम ) येथील घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने ३ री घाटकोपर जॉली जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा दिनांक १० ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान जिमखान्याच्या बँक्वेट हॉलमध्ये संपन्न होत आहे. प्रतिवर्षी लोकप्रिय होत असलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातून पुरुष एकेरी गटात २९६ तर महिला एकेरी गटात ५६ खेळाडूंनी भाग घेतला आहे. नुकताच मालदीवज येथे विश्व् कप स्पर्धेत जिंकून आलेल्या मुंबईच्या प्रशांत मोरेने या स्पर्धेत अग्र मानांकन प्राप्त केले आहे. तर महिला एकेरी गटात फार्मात असलेल्या विद्यमान युथ राष्ट्रीय विजेत्या समृद्धी घाडीगावकरला प्रथम मानांकनाचा मान मिळाला आहे. १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून त्यानंतर पुरुष एकेरी गटाच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. तर महिला एकेरी गटाचे सामने ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून खेळवण्यात येतील. १२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता महिला एकेरीचा अंतिम सामना व संध्यकाळी ५ वाजता पुरुष एकेरीचा अंतिम सामना खेळविण्यात येईल. या स्पर्धेतील उपउपांत्य फेरीपासूनचे सामने व इतर महत्वाच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून करण्यात येणार असून मराठी, हिंदी व इंग्रजीमधून त्याचे धावते समालोचन करण्याची व्यवस्था महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने केली आहे. स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून आंतर राष्ट्रीय पंच श्री केतन चिखले व सहाय्यक प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय पंच श्री विजय शेरला काम पाहणार आहेत. तर आंतर राष्ट्रीय पंच श्री अजित सावंत यांची तांत्रिक संचालक म्हणून असोसिएशनच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

स्पर्धेतील मानांकन पुढील प्रमाणे.

पुरुष एकेरी : १) प्रशांत मोरे ( विश्व् विजेता, मुंबई ), २) सागर वाघमारे ( राष्ट्रीय खेळाडू, पुणे ), ३) झैद अहमद ( आंतर राष्ट्रीय खेळाडू, ठाणे ), ४) विकास धारिया ( राष्ट्रीय खेळाडू, मुंबई ), ५) महम्मद घुफ्रान ( आंतर राष्ट्रीय खेळाडू, मुंबई ), ६) अभिजित त्रिपनकर (आंतर राष्ट्रीय खेळाडू, पुणे ), ७) समीर अन्सारी ( ठाणे ), ८) प्रफुल मोरे ( राष्ट्रीय खेळाडू, मुंबई )

महिला एकेरी : १) समृद्धी घाडीगावकर ( युथ राष्ट्रीय विजेती, ठाणे ), २) आकांक्षा कदम ( आंतर राष्ट्रीय खेळाडू, रत्नागिरी ), ३) केशर निर्गुण ( राष्ट्रीय खेळाडू, सिंधुदुर्ग ), ४) अंबिका हरिथ ( आंतर राष्ट्रीय खेळाडू, मुंबई ), ५) प्राजक्ता नारायणकर ( राष्ट्रीय खेळाडू, मुंबई उपनगर ), ६) मिताली पाठक ( राष्ट्रीय खेळाडू, मुंबई ), ७) रिंकी कुमारी ( राष्ट्रीय खेळाडू, मुंबई ), ८) सोनाली कुमारी ( राष्ट्रीय खेळाडू, मुंबई )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *