२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६
महाराष्ट्राला सागरी जलतरण,कबड्डी, सॉकरमध्ये कांस्य
दिक्षा यादवला रौप्‍यपदकाची हुलकावणी, कबड्डीत निसटता पराभव, सॉकरमध्ये अपयशी झुंज
दीव:  खेलो इंडिया बीच स्‍पर्धेत महाराष्ट्राच्‍या खेळाडूंनी सागरी जलतरण, कबड्डी व सॉकरमध्येही कांस्यपदकांची लयलुट केली आहे. सागरी जलतरणात साताऱ्याच्‍या दिक्षा यादवचे रौप्‍यपदक  अवघ्या ७ दशांश सेकंदाने हुकले. पुरूषाच्‍या बीच कबड्डीत केवळ ३ गुणांनी महाराष्ट्र उपांत्‍य फेरीत पराभव स्‍वीकारावा लागला.
दीवमधील अरबी समुद्रात सकाळच्‍या सत्रात १० कि.मी. सागरी जलतरणाचा थरार रंगला. महिलांच्‍या गटात सुरूवातीपासून महाराष्ट्राच्‍या २० वर्षीय  दिक्षा यादवे मुसंडी मारली होती. दुसऱ्या फेरीत ती मागे पडली. अखेरच्‍या टप्‍प्‍यात २.४८.०४ वेळ नोंदवून तीने कांस्य पदकाचा पल्‍ला गाठला. अवघ्या ७ दशांश सेकंदाने कर्नाटकच्‍या असरा सुधीरने रौप्‍य पदक तर २.४६.३४ वेळेत कर्नाटकच्‍याच अश्मिता चंद्राने सुवर्णपदकावर नाव कोरले. गतवर्षी याच प्रकारात दिक्षाने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. साताऱ्यातील दिक्षा ही  पुण्यातील शासनाच्‍या क्रीडा प्रबोधिनीत सराव करते. खेलो इंडिया विद्यीपीठ स्‍पर्धा, खेलो इंडिया युवा स्‍पर्धा तर खेलो इंडिया बीच स्‍पर्धेत १६ पदके जिंकण्याचा पराक्रम तीने केला आहे. महाराष्ट्रातील विजेत्‍यांची भेट घेत पथकप्रमुख नवनाथ फडतरे यांनी अभिनंदन केले आहे.
घोघला समुद्र किनाऱ्यावर रंगलेल्‍या बीच सॉकर मैदानात महाराष्ट्राच्‍या मुलांनी साखळी लढतीत चमकदार कामगिरी करत उपांत्‍य फेरीत मुसंडी मारली होती. उपांत्‍य लढतीत बलाढय केरळकडून १६-१  गोलने महाराष्ट्र पराभूत झाला. या कामगिरीमुळे सलग दुसऱ्या वर्षी कांस्य पदकावर महाराष्ट्राला समाधाव मानावे लागले. बीच कबड्डीतील पुरूषांची महाराष्ट्र विरूध्द हरियाणा लढत लक्षवेधी ठरली. पूर्वार्धात अभिषेक गुंगेसह सुरज दूंदळे यशस्‍वी चढाय्या करीत लढतीत चुरस कायम राखली होती. पूर्वार्धात १५ -१७ गुणांनी हरियाणा आघाडीवर होता. हीच आघाडी निर्णायक ठरली. उत्तरार्धात तुल्‍यबळ खेळाचे प्रदर्शन करीत शेवटच्‍या मिनिटापर्यंत ३०-३० बरोबरी करण्यात महाराष्ट्र यशस्‍वी ठरला होता.
शेवटच्‍या मिनिटाला हरियाणाने यशस्‍वी चढाई करीत महाराष्ट्राला ३ गुणांनी पराभूत करीत ३३-३० गुणांनी बाजी मारली. महिलांच्‍या उपांत्‍य सामन्‍यात राजस्‍थानकडून महाराष्टाला ५६-२८ गुणांनी पराभूत व्‍हावे लागले. उपांत्‍य फेरीतील अपयशामुळे महाराष्ट्राच्‍या दोन्‍ही संघाला कांस्यपदकावरच खेलो इंडिया मोहिमाचा समारोप करावा लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *